सोलापूर : जॉईन फॉर पीसचे जे.पी. शांतता पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या चार समाजसेवकांची निवड करण्यात आली आहे. रविंद्र मोकाशी, आनंद चंदनशिवे, अमजदअली काझी आणि इक्बाल शेख यंदाच्या जे.पी. पुरस्काराचे मानकरी असून, जागतिक शांतता दिनी, मंगळवारी, २१ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती जॉईन फॉर पिस मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला आणि सचिव प्रा. जैनोद्दीन पटेल यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली.
सन्मानपत्र, गौरवचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सोशल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय. जे.तांबोळी यांच्या हस्ते जागतिक शांतता दिनी, मंगळवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ०५ वा. सोशल कॉलेज, नवीन बिल्डींगच्या हॉलमध्ये निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत व कोरोना नियमांचे पालन करून कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती पुरस्कार निवड समितीने दिली आहे.
जॉईन फॉर पीस संस्था, समाजात सामाजिक सलोखा निर्माण होऊन शांतता व बंधूभाव निर्माण होण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे, याचाच एक भाग म्हणून २१ सप्टेंबर जागतिक शांतता दिनाचे औचित्य साधून समता, बंधूता या तत्वांना प्रमाणित मानून स्थानिक पातळीवर सामाज ऐक्य, शांतता व राष्ट्रीय एकत्मता जोपासण्याचे काम करणाऱ्या व्यक्तींना मागील तीन वर्षापासून “JP शांतता पुरस्कार” ने सन्मानीत करण्यात येत आहे.


















