सोलापूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कारभारावर कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. आरोग्य विभागाला येणाऱ्या निधीमध्ये औषध खरेदीला मोठ्या प्रमाणावर निधी येतो. सिव्हील हॉस्पिटल परिसरात असलेल्या औषध भांडारात बराच सावळा गोंधळ चालतो, आता तर या औषधांना भ्रष्टाचाराचा वास येत असल्याची जोरदार चर्चा जिल्हा परिषदेमध्ये सुरू झाली आहे.या औषध भांडाराचा चार्ज असलेल्या कर्मचाऱ्याला अचानक ह्दयविकाराचा झटका आल्याने ते उपचार घेत आहेत. त्यांचा चार्ज मार्च एन्डलाच यापूर्वी काम केलेल्या प्रवीण सोळंकी यांच्याकडे देण्यात आला आहे.
प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बागडे यांचे ही काम म्हणावे तसे नाही, त्या काम करताना चाचपडत असतानाचे चित्र आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही डॉक्टर बागडे यांच्या कामाबाबत वारंवार नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. सध्या औषधांच्या त्या दोन कोटीच्या फाईलची जोरदार चर्चा आहे, त्या फाईलवर सही करण्यासाठी डॉ बागडे यांच्यावर वरिष्ठ स्तरावरून दबाव आणला जात असल्याचे बोलले जाते, यात तत्कालीन आरोग्य अधिकाऱ्यासह राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या काही वादग्रस्त कर्मचाऱ्यांचा ही समावेश असल्याची जोरदार चर्चा जिल्हा परिषदेमध्ये आहे.
या प्रकरणात ‘लिंबोळे’कर्मचारी कोण? तो का या प्रकरणात दिसून येतोय. निश्चितच औषध भांडारात कुठे तरी पाणी मुरतंय, औषध वाटपात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय निर्माण होत आहे. याची चौकशी वरीष्ठ स्तरावरून होणार का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

















