सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी झेडपी मुख्यालयाच्या परिसर स्वच्छतेकडे लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हा परिषदेची इमारत जुनी असून यामध्ये हवा खेळती राहत नाही. कोंदट वातावरण झेडपीच्या आतील बाजूचा आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन यासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सर्व सभापतींच्या चेंबरमध्ये व्हेंटिलेशन अजिबात जाणवत नाही.
या सर्व बाबींचा विचार करून सीईओ आव्हाळे यांनी मुख्यालयाच्या या विषयाकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या समोरील बाजूने साधारण बारा वर्षांपूर्वी फायबरचे आवरण लावण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेचे समोरून रूपडे पालटले. परंतु त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयांमध्ये हवा खेळती बंद झाली.
आजपर्यंत या विषयाकडे कोणीच लक्ष दिले नव्हते परंतु आता मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी या विषयांमध्ये जातीने लक्ष दिले आहे. बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, बांधकाम कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी जिल्हा परिषदेच्या संपूर्ण इमारतीची पाहणी केली.
यावेळी आर्किटेक यांना बोलवण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या आतील बाजूस हवा खेळती राहण्यासाठी काय करावे लागेल? त्यासाठीचा प्लॅन सादर करण्याच्या सूचना सीईओ यांनी संबंधित बांधकाम विभागाला दिल्या आहेत.