14 एप्रिल 2021 आमच्या मुक्तीदात्याचा 130 वा जयंती दिन, कास्ट्राईब संघटनेच्या वतीने आणि जिल्हा परिषदेच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरा झाला. संघटनेतर्फे सर्वांन मिठाई वाटून आनंद साजरा केला मानसिक समाधान लाभले.
दि. 15/04/2021 व 16/04/2021 रोजी कार्यालयात उपस्थित राहून काम केले. दि. 17/04/2021 रोजी जेवण कडू लागू लागले, मनात शंकेची पाल चुकचूकली आणि दि. 18/04/2021 ला सकाळी खूप ताप आला, अंग दुखू लागले. त्याआधीच घरात पत्नी सौ. सुनंदा व मुलगा योगीराज हे दोघे सर्दी तापाने आजारी होते. रविवार असल्याने दवाखाने बंद होते. खूप काळजी वाटू लागली. काय करावे या चिंतेत असताना मला कास्ट्राईब संघटनेचे कार्याध्यक्ष् भगवान चव्हाण, विस्तार अधिकारी, आरोग्य विभाग दक्षिण सोलापूर यांची आठवण झाली व त्यांना फोन करुन परिस्थिती सांगितली, त्यांनी तात्काळ घरातील सर्वांना घेऊन केटरिंग कॉलेज संभाजी तलाव, विजापूर नाका येथील कोव्हीड सेंटर येथे जाऊन तपासणी करण्यास सांगितले. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चव्हाण यांनी फोन करुन सांगितले. मी सहकुटुंब पोहोचलो तेथे माझ्या पत्नीचे, मुलांचे दोन्ही सुना व नात, नातू यांचे कोरोना टेस्ट करुन घेतली. मी स्वत: माझी पत्नी व मुलगा पॉझिटीव्ह आलो. दोन्ही सुना व नात नातू निगेटिव्ह आले.
आम्ही तिघे त्याच दिवशी कोव्हीड सेंटर मध्ये ॲडमिट झालो, उपचार सुरु झाले. तेथील डॉक्टरांनी चांगली काळजी घेतली व बाहेरुन औषधे मागविली. परंतु चार दिवसांनी मला खूप त्रास होऊ लागला म्हणून तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याने दि. 23/04/2021 रोजी खासगी रुग्णालय म्हणजे मुळे हॉस्पीटल मध्ये ॲडमिट करण्यात आले. दोन-तीन दिवस तेथेही मला खूप त्रास झाला. खूप भिती वाटत होती. याच वेळी माझी पत्नी आणि मोठा मुलगा कोव्हीड सेंटरमध्ये उपचार घेत होते. आणि आम्हां सर्वांची धावपळ करुन काळजी घेणारा लहान मुलगा यशोधन देखील आमच्या संपर्कात आल्याने तो देखील कोरोना पॉझिटिव्ह निघाला. आता कुटुंबातील आम्ही चौघेही पॉझिटिव्ह झालो. यशोधनला मार्कंडेय हॉस्पीटलमध्ये ॲडमिट केले.
माझे मनोधैर्य खचले होते. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलिप स्वामी सर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत सर , मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार सर, जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. शितलकुमार जाधव या अधिकाऱ्यांनी मला फोन करुन धीर दिला. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना देखील फोन करुन माझ्या प्रकृती बद्दल चौकशी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी साहेब व उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत साहेबांनी मला व्हिडिओ कॉल करुन अत्यंत आपुलकीने विचारपुस केली. राऊत साहेबांनी रोज मला फोन करुन धीर दिला. या सर्व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या प्रेमामुळे मला उर्जा मिळाली, धीर मिळाला त्यांचे उपकार मी कधीही विसरणार नाही.
मला बेड मिळवण्यापासून ते ॲडमिट करेपर्यंत माझ्या संघटनेचे माझ्या जिवा-भावाचे सहकारी श्री चंद्रकांत होळकर, संजय कांबळे, नारायण ओतारी, भगवान चव्हाण, उमाकांत राजगुरु यांनी व माझा लहान बंधू बाबासाहेब, पुतण्या सुधाकर यांनी खूप परिश्रम घेतले. माझी काळजी घेतली हे मी कधीही विसरु शकत नाही. त्यांचा मी सदैव ऋणी आहे
माझ्या मित्र परिवारातील विजयकुमार राऊत, अविनाश गोडसे, कल्याण श्रावस्ती, आर.पी. कांबळे, रमेश खाडे, प्रशांत चाबुकस्वार, गिरीष देशपांडे, विजय टाकळीकर, सिध्दार्थ सोनवणे, लक्ष्मण् वंजारी, नागनाथ धोत्रे, सचिन साळुंखे, आनंद जाधव, गौतम हावळे, शंकर चलवादी, विलास मसलकर, प्रदिप सगट आदीसह सर्व संघटना पदाधिकारी व जिल्हा परिषद कर्मचारी यांनी फोनवर आस्थेने चौकशी करुन लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे, राज्य महासचिव मा. नामदेवराव कांबळे, वरीष्ठ उपाध्यक्ष् मा. गणेश मडावी यांनी सुध्दा मला बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचा आभारी आहे. व्यवस्थित उपचार घेऊन, आजारातून पूर्ण बरे होऊन मी, माझी पत्नी, दोन्ही मुले सुखरुप घरी आलो.
शरीरातील कोरानाचे विषाणू डॉक्टरांनी औषध उपचाराने घालवले पण मनातील भितीचे विचार जि.प. अधिकारी, संघटना कार्यकर्ते, मित्र परिवार, हितचिंतक यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपुलकीने चौकशी करुन धीर दिल्याने घालवले. आत्मविश्वास वाढविणारे सकारात्मक विचार देणारे सोलापूर जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांचा मी सदैव ऋणांतच राहीन. सदैव असेच प्रेम राहू द्या.
अरुण (भाऊ) क्षिरसागर,
जिल्हाध्यक्ष,
कास्ट्राईब जि.प. कर्मचारी संघटना,
सोलापूर.


















