जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने सलग तीन दिवस तालुका बैठका घेण्यात येणार असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर या बैठका काँग्रेस साठी महत्वाच्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यात मरगळलेल्या काँग्रेस पक्षाला डॉक्टर धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या रूपात युवा जिल्हाध्यक्ष मिळाला त्यांनी घेतलेल्या पदभार कार्यक्रमाची चर्चा सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात झाली. पदभार घेतल्या दिवशी त्यांनी सर्व ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन जिल्ह्याचा कारभार करण्याचे आश्वासन दिले. त्याच पद्धतीने त्यांनी आता सलग तीन दिवस काँग्रेस भवनामध्ये 11 तालुक्यांच्या बैठका लावल्या आहेत. बुधवार 15 सप्टेंबर रोजी उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी या चार तालुक्याच्या बैठका होणार आहेत.
त्यानंतर 16 सप्टेंबर गुरुवारी मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला या चार तालुक्याच्या तर 17 सप्टेंबर शुक्रवारी करमाळा, माढा व माळशिरस हे तीन तालुके बैठकीला बोलवण्यात आले आहेत.
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार रामहरी रुपनवर, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी, तसेच नव्याने प्रदेश काँग्रेस वर झालेल्या नियुक्त पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या बैठका होणार आहेत.
हे ही वाचा, मोहोळच्या संजय अण्णांना तूर्त दिलासा ; जात दाखल्यावर झाला हा निर्णय
2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसला मरगळ आली. ज्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे होती त्या नेत्याने या पदाला अपेक्षित न्याय दिला नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात बदल केले युवा असलेल्या धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा दिली. आगामी सोलापूर जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व असून जिल्ह्यातील व प्रत्येक तालुक्यातील पक्षाची सत्य परिस्थिती कॉंग्रेस भवनात होणाऱ्या तीन दिवसांच्या बैठकीत समोर येणार आहे.



















