सोलापूर : देशाचे जवान…परिवारापासून दूर राहून सीमेवर देशाची सेवा करतात, त्यांचे गावपातळीवरील शासन दरबारी अनेक प्रश्न प्रलंबित असतात. शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे आपल्या कार्यालयात कामकाज करत होते. त्याचवेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील भारतीय बीएसएफ मध्ये सेवेत असलेले मदार गुलाब तांबोळी हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले.
यावेळी ते मिल्ट्रीच्या ड्रेसमध्ये होते. त्यांनी भेटण्यासाठी चिट्ठी दिली, जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित आत बोलावले, आपल्या शेजारी बसवले, आत्मीयतेने विचारपूस केली. तांबोळी यांचे कासेगाव मध्ये शेत असून त्यांचे वडील व भाऊ हे शेती करू देत नाहीत. मदार तांबोळी यांच्या बाजूने न्यायालयाचा निकाल असल्याचे कागदपत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दाखवले.
शंभरकरांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेतले, विषय इतक्या दिवस प्रलंबित का?तातडीने नोटीसा काढा, देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांचे प्रश्न आपण सोडवू शकत नाही का? या शब्दात त्यांनी खडसावले. दरम्यान जवान तांबोळी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या संवेदनशीलतेचे आभार मानले. त्यांनी दिलेला सन्मान पाहता माझा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

















