सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या कामकाजाच्या पद्धतीची कायम चर्चा असते. एखादे काम त्यांनी मनावर घेतले की ते त्याचा पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेण्याकडे त्यांचा कल असतो. जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे वृद्ध, अपंग, निराधार यांची आपुलकीने विचारपूस करीत असतात.
संजय गांधी निराधार योजनेसाठी प्रत्येक लाभार्थ्याला हयातीचा दाखला दरवर्षी बंधनकारक आहे. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी नव्या अर्जदाराला 21000 वार्षिक उत्पन्नाचा दाखला बंधनकारक आहे. सोलापूर शहरातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची सध्या उत्तर सोलापूर तहसील कार्यालयामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
या गर्दी मागचे कारण म्हणजे हयातीचा दाखला आहे. यासाठी जुनी फौजदार चावडी या ठिकाणी मंडल अधिकारी कार्यालय असून या दाखल्यासाठी लाभार्थ्यांना मंडलाधिकारी कार्यालयाकडेही पडताळणीसाठी फेऱ्या माराव्या लागतात. ही अडचण लक्षात घेऊन पत्रकारांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना याप्रकरणी माहिती दिली.
तेव्हा तातडीने जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आता मंडल अधिकारी हे आपले जुनी फौजदार चावडी कार्यालय सोडून सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत उत्तर तहसील कार्यालयात हजर राहतील अशा सूचना तहसीलदार सैफन नदाफ यांना दिल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे फेऱ्या मारणाऱ्या निराधारांसाठी आता चांगलीच सोय झाली आहे.


















