सोलापूर : सांगोला तालुक्यातील काही गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबा कारंडे यांनी करत कार्यकारी अभियंता दीपक कोळी व उप अभियंता कमळे यांची चौकशी करण्याची मागणी पत्रकार परिषदेत करत याची चौकशी करण्याची मागणी केली होती.
एकट्या सांगोला तालुक्यात कामे न करता ५ कोटी ७२ लाखाची बिले उचलली गेली असल्याचे कारंडे म्हणाले होते. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, लेखा अधिकारी कैलास कुंभार, पाणी व स्वच्छता विभागातील सचिन सोनकांबळे यांची त्रीसदस्यीय समिती चौकशीसाठी नेमली होती.
त्या कुलकर्णी समितीचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला. मंगळवारी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी पत्रकारांशी बोलताना या अहवालात काही गंभीर बाबी समोर आल्याचे सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या सूचनेनुसार ग्रामपंचायत स्तरावर सल्लामसलत केल्याशिवाय बिल अदा करू नये या अटीचेही उल्लंघन झाले आहे. तसेच टेंडर मध्ये 60 टक्के बिल अदा करण्याची अट असताना 80 टक्के बिल अदा केली गेली आहेत. त्याही अटीचे पालन झालेले नाही.
दरम्यान ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा अभिप्राय मागवून पुढची दिशा ठरवू असे सांगताना उपअभियंता कमळे हे दोषी आहेत की नाही याबाबत विभागाचा अभिप्राय आल्याशिवाय सांगता येणार नाही अशी माहिती प्रभारी सीईओ कोहिनकर यांनी दिली. आता या प्रकरणात तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी हे मात्र सुटल्याचे दिसत आहे.