सोलापूर : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील जलजीवन मिशन या महत्त्वाची योजनेमध्ये झालेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी आढावा घेतला या बैठकीला आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार संजयमामा शिंदे यांची उपस्थिती होती. तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांच्या कामकाजाची पुन्हा चर्चा झाली. पालकमंत्र्यांनी या प्रकरणात अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावल्याचे बोलले जाते.
दरम्यान सांगोला शेतकरी कामगार पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा कारंडे यांनी हा विषय चांगलाच लावून धरला आहे सांगोला तालुक्यातील नऊ गावांमध्ये कामे न करता ५ कोटी ७२ लाखाची बिले उचलली गेली असल्याचा आरोप करत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्या प्रकरणाच्या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला.
यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या सूचनेनुसार ग्रामपंचायत स्तरावर सल्लामसलत केल्याशिवाय बिल अदा करू नये या अटीचेही उल्लंघन झाले आहे. तसेच टेंडर मध्ये 60 टक्के बिल अदा करण्याची अट असताना 80 टक्के बिल अदा केली गेली आहेत. त्याही अटीचे पालन झाले नसल्याच्या बाबी समोर आल्या उपअभियंता कमळे याची मात्र या प्रकरणात अडचण झाली आहे.
सोमवारी बाबा कारंडे हे आपल्या काही पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेमध्ये आले होते, त्यांचा या प्रकरणात कायम पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी बराच वेळ कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांनी कारंडे यांच्याशी चर्चा केली असता प्रशासन दीपक कोळीच्या चुकांवर किती जरी पांघरून घातले तर आम्ही सोडणार नाही, जलजीवन मिशनचा टेंडर क्लर्क पाटील हा महाचोर आहे त्यालाही आम्ही सोडणार नाही अशा भाषेत त्यांनी पत्रकारांसमोर संताप व्यक्त केला.

















