सोलापूर : जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दीड महिन्यानंतर आपला पदभार स्वीकारला. पुणे आणि अहमदनगर या दोन मोठ्या जिल्हा परिषदेमध्ये काम केल्याचा अनुभव सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कामी आल्याचा सांगत आपण या चॅलेंजिंग अशा सांभाळलेल्या जबाबदारीवर समाधानी असल्याची प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी हे आपल्या प्रशासकीय ट्रेनिंगसाठी तब्बल दीड महिने मसुरी या ठिकाणी गेले त्यांचा पदभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्याकडे देण्यात आला होता. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये जॉईन होऊन केवळ दीड महिन्यातच कोहिणकर यांच्याकडे सीईओ पदाचा चॅलेंजिंग पदभार आला.
चॅलेंजिंग एवढ्यासाठीच म्हणावा लागेल मार्च महिना त्यात कोट्यावधी निधी खर्च करण्याचे आव्हान, जिल्हा परिषदेचे बजेट करायचे होते अशातच तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी जलजीवन मिशन योजनेत काम करताना लावलेले ‘दिवे’ त्याबद्दलच्या शेकडो तक्रारी या पार्श्वभूमीवर कोहिणकर यांच्याकडे हा पदभार आला होता. या दीड महिन्यात त्यांनी अतिशय झोकून देत काम केले.
शनिवारी पत्रकारांनी त्यांची भेट घेऊन दीड महिन्याच्या कामकाजावर प्रतिक्रिया विचारली, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांच्यासह सर्व विभाग, प्रमुख गटविकास अधिकारी, ग्रामसेवकांनी या काही दिवसात अतिशय कष्ट घेतल्याने आपण त्यांच्या कामावर समाधानी आहोत अशी प्रतिक्रिया कोहिणकर यांनी दिली.
समाज कल्याण विभागाच्या तब्बल 52 कोटीच्या प्रशासकीय मान्यतेसह जलसंधारण विभाग 10 कोटी, बांधकाम विभाग 20 कोटी, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, ग्रामपंचायत विभागाच्या जनसुविधा, नागरी सुविधा, तीर्थक्षेत्र अशा एकूण सुमारे 100 कोटीच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मार्च महिन्यात सुमारे 95 टक्के प्रशासकीय मान्यता झाल्याचे त्यांनी सांगितले. यामागील महिन्याभरात जलजीवन मिशनच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या. त्याचेही निराकरण कोहिनकर यांनी केले. ‘जलजीवन’ च्या 170 कामांच्या वर्क ऑर्डर दिल्याची माहिती त्यांनी दिली.


















