सोलापूर – प्रभाग क्रमांक 19 चे माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांनी महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी प्रभाग क्रमांक १९ मधील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.
चिखलमय रस्त्यावरून गाड्या येणे तर सोडाच नागरिकांना चालत ये-जा करणे सुद्धा अशक्य झाले आहे. अशा रस्त्यांवरून जाताना अनेक वयोवृद्ध माता-भगिनी व शाळकरी मुले पाय घसरून पडण्याचे प्रकार वारंवार होत आहेत.
विशेषतः महालक्ष्मी नगर, महानंदा नगर, निलम नगर मधील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते, गोणे नगर, राजरत्न नगर, ताई चौक परिसर, स्वागत नगर रोड लगतचे किरण नगर, मल्लिकार्जुन नगर, पार्वती नगर, आडम प्लॉट, जमादार वस्ती, नक्का वस्ती, आरती नगर, निवारा नगर व विनायक नगर आदी भागातील नागरिक प्रचंड वैतागले आहेत.
मागणी करूनही झोन कडून मुरूम उपलब्ध होत नाही. तरी आयुक्तांनी आपल्या अधिकारी व कर्मचारी यांना या रस्त्यांची पाहणी करून त्वरित मुरूम टाकण्यास सांगावे. तसेच शक्य तितक्या लवकर या भागातील रस्ते डंबरीकरण पूर्ण होण्यासाठी निधीची तरतूद केल्यास गोर-गरीब कष्टकरी जनतेचे आशीर्वाद आपल्याला लाभतील. शिवाय, अमृत योजनेतील भुयारी गटार योजनेतील रखडलेले काम लवकर करण्यासाठी व काम झालेल्या भागात रस्ता सपाटीकरण करण्यासाठी संबंधित मक्तेदाराला सूचना द्याव्यात अशी मागणी धुत्तरगावकर यांनी केलीयं.




















