सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी आपल्या राष्ट्रवादी परिवार संवाद अभियान अंतर्गत सोलापूर शहर पदाधिकाऱ्यांशी मनमोकळेपणे संवाद साधला. उपस्थित कार्यकर्त्यांना त्यांनी चांगलेच चिमटे काढले. सुरुवातीला शहराध्यक्ष भारत जाधव हे प्रास्ताविक करण्यासाठी उठले त्यांनी आपले भाषण संपवले याच वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भरत जाधव यांची चांगलीच फिरकी घेतली.
तुम्ही शहरात किती सभासद नोंदणी केली याची माहिती विचारली. तेव्हा भारत जाधव यांनी आम्ही सभासद नोंदणीसाठी दोन हजार पुस्तके घेतली होती त्यात आठशे पुस्तके भरून तयार आहेत अशी माहिती दिली. एका पुस्तकाला 110 रुपये प्रमाणे किती होतात असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला तेव्हा काही वेळ जाधव यांनाही हिशोब घालता आला नाही, विचार केल्यानंतर जाधव यांनी 81 हजार रुपये सांगितले.
तेव्हा जयंत पाटलांनी 81 नाही 88 हजार होतात तर द्या माझे 88 हजार रुपये म्हणत हात पुढे केला. सर मी हे पेमेंट मी धनादेशाद्वारे देतो असे भारत जाधव सांगितले, जयंत पाटलांनी तो धनादेश वटणारा पाहिजे असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
या संवाद अभियानात जयंत पाटील यांनी सोलापूर शहरातील तीनही विधानसभा मतदार संघ अध्यक्षांचा ‘क्लास’ घेतला यावेळी अनेकांची घाबरगुंडी उडाली. शहर दक्षिण विधानसभा अध्यक्षांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तरे दिली मात्र शहर मध्य विधानसभा अध्यक्षाला कोणतेही उत्तर देता आले नाही.
शहर उत्तर च्या अध्यक्षांनी प्रदेशाध्यक्षांचे बऱ्यापैकी समाधान केले. यावेळी आगामी महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना उमेदवारी देताना जुना नवीन बघणार नाही, एजन्सीकडून सर्वे होईल, ज्याचा काम असेल त्यालाच उमेदवारी मिळेल इलेक्टरीव मिरीट प्रमाणे उमेदवारी मिळेल असे ठणकावून सांगितले.
















