सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात लॉकडाऊनच्या काही दिवसांनंतरही रुग्ण संख्या आटोक्यात येताना दिसून येत नाही त्याचप्रमाणे मृत्यूचे प्रमाणही कमी होत नाही, या पार्श्वभूमीवर रविवारी झेडपी सीईओ स्वामी यांनी वेबेक्स मिटींगद्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितल जाधव यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी यांचेशी कोविड नियंत्रणा संदर्भात ऑनलाईन संवाद साधला. यावेळी जिल्हा आयुष अधिकारी डॉ विलास सरवदे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच कोविड केअर सेंटरचे नोडल अधिकारी उपस्थित होते. यावेळी पुढील मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
१) चाचण्यांचे प्रमाण वाढविणे.
२) रुग्णांच्या संपर्कातील सहवासीतांचा शोध घेणे.
३) गृह विलगीकरणा संदर्भात आणखी काही नियम करणे आवश्यक आहे का?
४) कंटेंन्मेंट झोनची कडक अंमलबजावणी करणे.
५) ग्रामीण भागात प्रभावी औषधोपचार कशाप्रकारे करता येईल त्याच प्रमाणे इतर आवश्यक साहित्यांची उपलब्धता करता येईल.
६) घरोघरी जाऊन सर्व्हेक्षणावर भर देणे.
अशा मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यूच्या वाढत्या प्रमाणावर खालील मुद्यांवर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
१) कोरोनाची सौम्य लक्षणे अथवा लक्षणे नसलेल्या रुग्णांनी जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घ्यावेत.
२) तिव्र लक्षणे असलेले अथवा इतर गंभीर आजाराने ग्रस्त रूग्णांना कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात यावे. सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांनी कोविड हॉस्पिटल मधील बेड अडवून ठेवू नयेत.
३) खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी लक्षणे असलेल्या रुग्णांना तातडीने चाचणी करून घेण्यासाठी आग्रह धरावा तसेच अशा रुग्णांची माहिती आरोग्य प्रशासनास तात्काळ द्यावी. माहिती न देणाऱ्या खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे मत काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यामुळे लोक चाचणी करून घेण्यासाठी समोर येत नाहीत व नंतर अवस्था गंभीर झाल्यावर रुग्णालयात दाखल होताना दिसून येत आहे. मृत्यूचे प्रमाण वाढण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.
४) रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट निगेटिव्ह असलेल्या रुग्णांनी नियमानुसार क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे परंतु असे लोक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत व ते लोकांमध्ये मिसळत आहेत. अशा लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
५) लहान मुले व नवयुवकांनी चाचण्या करून घेण्यासाठी समोर येणे आवश्यक आहे. मागील काही दिवसांपासून आठरा वर्षाच्या आतील मुलांचे बाधीत होण्याचे प्रमाण वाढत आहे व ही बाब गंभीर आहे.
६) आजार मग तो कोणताही असो अंगावर काढण्याची सवय कोविडच्या परिस्थितीत धोकादायक ठरत आहे व त्यामुळेच मृत्यू वाढत असल्याचे काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मांडलेल्या अडचणी जाणून घेतल्या तसेच त्यांच्याकडून आलेल्या सुचनांचे स्वागत करुन आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंबंधी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांचेशी चर्चा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.



















