भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सोलापूरचा सहभाग लक्षणीय आहे. त्याकाळी सोलापुरातील घटनांनी साऱ्या जगाला दिपवून टाकले होते. त्यापैकी मार्शल कायद्याचा काळ एक धगधगते अग्निकुंडच म्हणावे लागेल. सोलापूर शहराच्या नावाचे इंग्रजी स्पेलिंग नाव शोलापूर असे केले जाई. शोलापूर म्हणजे शोलोंका हुतात्माओंका शहर, असे काहीजण म्हणत १२ जानेवारी १९३० साली सोलापूर शहरातील मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे,कुर्बान हुसेन या चार तरुण देशभक्ताना ब्रिटिशांनी पुण्याच्या येरवडा तुरुंगात फासावर चढवले. आपल्या प्राणांची आहुती देऊन या चार हुतात्म्यांनी सोलापूर शहराचे नाव भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अमर केले. सोलापूरचा हाच धगधगता इतिहास आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सिरीजच्या रूपात तयार केला जाणार आहे. त्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशन इनफॉटेनमेंट यांनी पुढाकार घेतला आहे. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर, संचालिका मयुरी वाघमारे, सल्लागार अमित जैन, नरेंद्र काटीकर, रमेश धाकलिया, सुनील नाईक यांच्या उपस्थितीत बुधवारी पत्रकार परिषद झाली.
राहुल सोलापूरकर यांनी या प्रकरणी अधिक माहिती देताना स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही वेबसाईट तयार करण्यात येणार आहे यामध्ये 1927 ते 12 जानेवारी 1930 या दरम्यान चा इतिहास दाखवण्यात येणार असून त्यासाठी सोलापूरकरांनी आवश्यक ते सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत सोलापूरचे योगदान किती आणि कसे राहिले यावर प्रकाश टाकला जाणार आहे. नामवंत नाट्य चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर हे या मालिकांच्या चित्रिकरणासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी या योगदनाविषयीचा अधिकृत इतिहास संकलित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यासाठी आवश्यक असलेली अनेक कागदपत्रे, दस्ताऐवज, पुस्तके, पत्रे, वृत्तपत्रातील कात्रणे अजूनही सर्वत्र विखुरलेली आहेत. अशा प्रकारचे पुरावे ज्यांच्याकडे असतील त्यांनी या मालिकेसाठी ती द्यावीत असे आमचे आवाहन आहे. हे दस्ताऐवज देणार्या लोकांकडून त्यांच्या प्रति करून घेतल्या जातील आणि मूळ दस्ताऐवज त्यांच्याकडेच राहतील. म्हणजे अशा जाणकार लोकांच्या संग्रहाला कसलाही धक्का लागणार नाही.
ज्यांच्याकडे असे दस्ताऐवज असतील किंवा ज्यांना अशा पुराव्याची, दस्ताऐवजांची माहिती असेल त्यांनी विपुल लावंड फोन क्रमांक 7767080999 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलंय.





















