“भगवान शिंदे यांच्या निधनानंतर गोकुळ परिवार कोलमडला होता या परिवाराने दत्ता शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली धोत्री( दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगर्सच्या चेअरमन आणि कार्यकारी संचालक पदाची सूत्र हाती येताच दत्ता शिंदे यांनी कारखान्याचा अडचणीत सापडलेला रथ मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने बाहेर काढला सर्व प्रकारची देणी चुकती करून कारखाना सुस्थितीत आणला आहे”.
सोलापूर : अनेक अडचणींचा सामना करीत धोत्री ( तालुका दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगरच्या व्यवस्थापनाने गतवर्षी गाळप केलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीपेक्षा जादा दर देऊन आतापर्यंतची उच्चांकी दराची परंपरा कायम राखली आहे . कारखान्याने प्रति टन 2111 रुपये प्रमाणे ऊस बिलाची रक्कम शुक्रवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे यांच्या आकस्मिक निधनाने परिवारासह शेतकऱ्यावर चिंतेचे सावट होते . गतवर्षीच्या गळीत हंगामासाठी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या रकमा मिळाल्या नव्हत्या तर ऊस तोडणी यंत्रणा आणि मजुरांची बिले थकली होती. गोकुळ परिवारावर भगवान शिंदे यांच्या आकस्मिक निधनाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करण्याचे आव्हान होते . नव्याने कारखान्याची सूत्रे हाती घेतलेले चेअरमन आणि कार्यकारी संचालक दत्ता शिंदे , एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कपिल शिंदे यांनी जिद्दीने त्यावर मात केली.
यापुर्वी गोकुळ शुगरने प्रतिटन २६१० रुपये दर दिला होता त्यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील अन्य कारखान्यांच्या तुलनेत तो उच्चांकी दर होता. गतवर्षीच्या हंगामासाठी या कारखान्याला २०१८ रुपये एफआरपी निश्चित करण्यात आला. मात्र कारखान्याने त्याहीपेक्षा जादा दर देण्याचा निर्णय घेतला. २१११ रुपये प्रमाणे ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे, अशी माहिती चेअरमन दत्ता शिंदे , संस्थापक बलभीम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आगामी गळीत हंगामासाठी ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना बिलाची रक्कम दर दहा दिवसांनी अदा करण्यात येणार आहे. तीन हप्त्यात रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे नियोजब असल्याचेही त्यांनी सांगितले. गळीत हंगामापूर्वीची कामे संपत आली आहेत.यंदाच्या गळीत हंगामात पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे . प्रतिदिन ४,५०० मे टन गाळप क्षमता असून अठरा मेगावॅटचा सहवीजनिर्मिती प्रकल्प आहे .याच गळीत हंगामापासून आसवनी (डिस्टिलरी) प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचेही कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कपिल शिंदे यांनी सांगितले.
कारखान्याकडे आगामी गळीत हंगामासाठी १०,५०० हेक्टर ऊसाची नोंद करण्यात आली आहे दक्षिण सोलापूर , उत्तर सोलापूर, तुळजापूर, बार्शी , उस्मानाबाद, मोहोळ आणि अक्कलकोट या सहा तालुक्यांच्या कार्यक्षेत्रात ऊसाची नोंदणी सुरु आहे. तरी शेतकऱ्यांनी गोकुळ शुगरला ऊस पुरवठा करून सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन दत्ता शिंदे, कारखान्याचे संस्थापक बलभीम शिंदे यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे डायरेक्टर विशाल शिंदे आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते.



















