सोलापूर : अतिशय बिकट परिस्थिती आणि संकटांवर मात करत गोकुळ शुगर लिमिटेडचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी कारखान्यात सन 2021-22 मध्ये 7 लाख 71 हजार मेट्रिक टन विक्रमी गाळप केले आहे. त्या प्रित्यर्थ शेतकरी स्नेह मेळावा व गाळप हंगाम सांगता समारंभ घेतला.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर आमदार संजय शिंदे, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, दीपक साळुंखे पाटील, लोकनेते चेअरमन बाळराजे पाटील, प्रदेश सचिव संतोष पवार, तुळजा भवानी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुनील चव्हाण, बलभीम शिंदे, कपिल शिंदे, विशाल शिंदे यांच्यासह हजारो शेतकरी या मेळाव्याला उपस्थित होते. आपल्या भाषणातून दत्ता शिंदे यांनी कारखान्याची वाटचाल सांगितली.
अतिशय अडचणीतून कारखाना बाहेर काढला सात लाख मेट्रिक टन यंदा गाळप झाले असून 140 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याचे सांगताना आगामी काळात दहा लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट त्यांनी बोलून दाखवले. शेतकरी हीच आपल्या कारखान्याची संपत्ती असून त्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी लढवण्याची आपली तयारी आहे.
आम्ही तिघा भावांनी पुढील जीवन शेतकऱ्यांसाठी घालवायचे असा निर्णय घेतला आहे त्यासाठी सर्व नेत्यांचे मार्गदर्शनाची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली. कारखाना परिसरात रस्त्याची बिकट अवस्था आहे त्या रस्त्यासाठी निधी देण्यासाठी शासन स्तरावर सहकार्य मिळावे तसेच एकरुख उपसा सिंचन योजनेचे निधीअभावी काम थांबले आहे. यासाठी ही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी बोलून निधी मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
आगामी विधानपरिषदेच्या उमेदवारीबाबत काही मित्रांनी इच्छा व्यक्त केली मात्र राजकीय परिस्थिती पाहता ज्येष्ठ नेते ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतील त्यानुसार आपली वाटचाल राहील असे सांगत त्यांनी नकळत नेत्यांसमोर विधान परिषदेसाठी इच्छा व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. एकूणच या शेतकरी स्नेहमेळावा अडून दत्ता शिंदे यांनी एक प्रकारे शक्तिप्रदर्शन केल्याचं दिसून आलं. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

















