सोलापूर : सोलापूर सुरमणी व महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहम्मद अयाज यांच्या सांगितिक प्रवासाची दखल इंडिया बुक रेकार्डस् ने घेतली आहे. मोहम्मद अयाज यांना हे मानपत्र लवकरच प्रदान करण्यात येणार आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना, हे मानपत्र मी सोलापूरच्या समस्त कलावंताना समर्पित करतो, या शब्दात मोहम्मद अयाज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मोहम्मद अयाज यांची उत्तुंग गगनभरारी हा प्रेरणादायी प्रवास आहे. सामान्य कुटुंबातील जन्म… जिल्हा परिषदेच्या शाळेतलं प्राथमिक शिक्षण… त्याच खेडेगांवात माध्यमिक शिक्षण… या वाटचालीत एके काळी गाणी ऐकण्यासाठी कॅटींनमधील रेडियो हे एकमेव माध्यम … आपल्या दैनंदिन गरजा भागविण्याबरोबर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी हॉटेलात कप-बश्या धुण्याचं अयाज यांच्या जीवनातील पहिलं काम …
हॉटेलात काम करीत असताना दिवसभर रेडियोवरुन कानी पडणारी गाणी अयाज यांच्या थेट हृदयापर्यंत पोहोचली होती. रेडिओवरुन ऐकलेली गाणी ऐकून ऐकून पाठांतर करण्याचा, शेतामध्ये, कधी विठ्ठल मंदिरामध्ये एकांतात, शाळेत, शेतामधे गुरं-ढोरं चारत असताना गाणी गात, आपण एक गायक कलावंतच बनायचे, असं स्वप्न पाहणे, हे अतिशय मुश्किल होते.
कर्नाटक-महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप या गांवाच्या चहा कॅटिंनपासून सुरू झालेला मोहम्मद अयाज यांचा प्रवास..!
मोहम्मद अयाज यांचा मंद्रुप ते मलेशियाचा प्रवास असो अथवा सौदी अरेबिया येथील भारतीय दूतावासामध्ये भारतीय संगीत सादरीकरण असो, कुटुंबात संगिताचा वारसा नसताना गायन स्पर्धांमध्ये सहभाग, अनेक वेळा गायन स्पर्धांमध्ये पराभव स्वीकारावा लागला तरी, ‘ असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे ‘ या संत तुकोबांच्या ओवीप्रमाणे अयाज यांचा सुरू राहिला. त्यातूनच अयाज यांचा ‘महाराष्ट्राचा महागायक’ पर्यंतचा प्रवास खडतर तरी सुखद ठरला.
एक ध्येयवेडा एकलव्य गायक ते संगीतकार अशा मोहम्मद अयाज यांचा प्रवास हा थक्क करणारा आहे. मोहम्मद अयाज यांचा गायक ते संगीतकार असा स्वप्नातले सत्त्यात उतरविणारा एक अचंबित करणारा प्रवास आहे.
या वाटचालीत गायन आणि संगित क्षेत्रातील जणू दिपस्तंभांचे सानिध्य लाभले. ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, ऋदयनाथ मंगेशकर, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, अनुप जलोटा, हेमलता, विश्वजीत, साधना सरगम, सपना अवस्थी, रविना टंडन, वर्षा उसगांवकर, रामशंकर, अवधुत गुप्ते, बेला शेंडे, दिपाली सय्यद अशा अनेक कलावंतासोबत मोहम्मद अयाज यांचा ध्वनि चित्रफीत असो अथवा कार्यक्रम सादरीकरण असो, आपला सांगितिक प्रवास चालू ठेवलेला आहे.
खडतर प्रवास असलेले मोहम्मद अयाज यांनी अनेक संकटांना तोंड देत व परिस्थितीशी मुकाबला करीत आपल्या कलेच्या माध्यमातून सोलापूरचा लौकिक जगभरात पोहोचविला आहे, म्हणून मोहम्मद अयाज यांचं नांव इंडिया बुक रेकार्डसाठी निवड करण्यात आली आहे.
मोहम्मद अयाज यांना या निमित्ताने लवकरच मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना, हे सन्मान मी सोलापूरच्या समस्त कलावंताना समर्पित करतो, या शब्दात मोहम्मद अयाज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.




















