सोलापूर : जिल्हा परिषदा या राज्याच्या मिनी मंत्रालय म्हणून संबोधल्या जातात. ग्रामीण भागाचा संपूर्ण कारभार जिल्हा परिषदेमधून चालतो, अनेक योजना शासनाचे उपक्रम इथून राबवले जातात. अशी सोलापूर जिल्हा परिषद सध्या विभागप्रमुखांवाचून पोरकी झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे कुणी एचओडी देता का? एचओडी अशी मजेदार चर्चा होऊ लागली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या 10 विभाग प्रमुख नाहीत. यामध्ये आता मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार यांचीही मुंबईला प्रमोशन वर बदली झाली आहे. शुक्रवारी कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांचीही सांगलीला बदली झाली आहे. यापूर्वी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा, कार्यकारी अभियंता जलसंधारण, शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या विभागांना पूर्णवेळ अधिकारी नाही.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांच्याकडे तीन पदभार आहेत. महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी जावेद शेख यांच्याकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे. उपशिक्षणाधिकारी संजय जावीर प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार पाहतात. डॉक्टर सोनिया बागडे या जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा पदभार पाहत आहेत. पंडित भोसले हे मागील अनेक वर्षापासून कार्यकारी अभियंता जलसंधारण विभागाचे काम पाहतात. सुनील कटकधोंड हे सध्या वादग्रस्त ठरलेल्या जलजीवन मिशनचे कार्यकारी अभियंता आहेत.
त्यामुळे जिल्हा परिषदेचा 70% कारभार हा प्रभारी अधिकाऱ्यांवर चालतो. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शासनाकडे तीन वेळा पत्रव्यवहार करून पूर्णवेळ अधिकारी देण्याची मागणी केली आहे. परंतु त्यांच्या प्रयत्नांना अजूनही यश आले नाही. अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये बारीक लक्ष देणारे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता सोलापूर जिल्हा परिषदेमध्येही लक्ष घालून पूर्णवेळ अधिकारी देण्यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


















