सोलापूर : बुधवार हा दिवस सोलापुरात राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला. त्याला कारण ही तसेच होते. गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे संपूर्ण दिवसभर सोलापूर शहर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमाची मेजवानी झाली. चर्चेचा विषय ठरले ते राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांच्या निवासस्थानी दिलेली भेट. त्या भेटीचीच दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा होती.
यानंतर सायंकाळी त्यांच्या हस्ते सोलापुरातील एका मोठ्या खाजगी हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. रात्रीच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. अमोल बापूंनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे अतिशय जंगी आणि दिमागदारपणे स्वागत केले. क्रेनने हार घालून डॉक्टर सावंत यांचा सत्कार अमोल शिंदे यांनी केला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे उपस्थित होते. यावेळी शिंदे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी बराच वेळ चर्चा केली. यावरून बुधवारचा दिवस हा गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला आणि सर्वत्र त्यांचाच रुबाब पाहायला मिळाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.


















