सोलापूर : राजकारणात कोण कुणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो. त्याचबरोबर कोण कुणाचा समर्थक आहे हे महत्वाचे नाही. पण कुणाचे लग्न असेल किंवा मयत असेल तर विरोधक ही ते अटेंड करतात. ही आपली संस्कृती आहे मात्र नुकतेच निधन झालेल्या भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक सुनील कामाठी यांच्या अंत्ययात्रेला सोलापुरातील सर्व धर्मातील समाज बांधव सहभागी झाला.
सोलापुरातील चौका चौकात कामाठी यांचे पोस्टर लावून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर रविवारी हुतात्मा स्मृती मंदिरात कामाठी यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या शोकसभेत जरी विरोधी पक्षाच्या आमदार असल्या तरी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी कामाठी यांच्या आठवणीने संपूर्ण सभागृह गहिवरले त्यात आमदार प्रणिती ताईंच्या डोळ्यात ही अश्रू पाणवल्याचे पाहायला मिळालं.
याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे तब्बल दोन दिवस सोलापुरात होते. त्यांच्यासोबत पक्षाचे तीन ते चार आमदार दौऱ्यात होते परंतु यापैकी एकाने ही त्यांच्या निवासस्थानी भेट तर दिलीच नाही परंतु कामाठी यांच्या कुटुंबाचे सांत्वनही केले नसल्याची माहिती मिळाली आहे. पालकमंत्र्याच्या सोबत फिरणाऱ्या आमदारांनाही कामाठीची आठवण झाली नाही हे सोलापुरातल्या भारतीय जनता पार्टीचे दुर्दैव म्हणावे लागेल अशी चर्चा आता सोलापुरातून ऐकण्यास मिळत आहे.



















