सोलापूर : काँग्रेस पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी सलग तीन दिवस जिल्ह्यातील 11 तालुक्यांच्या बैठका लावल्या आहेत त्यामध्ये सर्वाधिक लक्ष लागले होते ते दक्षिण सोलापूर तालुक्याच्या बैठकीकडे. बुधवारी काँग्रेस भवनात झालेल्या बैठकीला जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार रामहरी रुपनवर, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे, अशपाक बळोरगी, बाबा मिस्त्री, महिला जिल्हाध्यक्ष शाहीन शेख, अलका राठोड, नलिनी चंदेले, तालुकाध्यक्ष हरीश पाटील, बाळासाहेब शेळके, सचिव पंडित सातपुते, बसवराज बगले, कमल कमळे, जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, अशोक देवकते, धनेश आचलारे, भीमाशंकर जमादार, मोतीराम चव्हाण, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला या बैठकीमध्ये अनेक युवा कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त करताना दक्षिण तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, तो तालुक्यातील नेत्यांनी एकमेकांचे पाय खेचाखेची केल्याने ढासळला बाबा मिस्त्री सारख्या नवख्या माणसाने बलाढ्य नेत्याला टक्कर दिली त्यामुळे ग्रामीण मध्ये अजूनही काँग्रेसला मानणारा वर्ग आहे. ते तालुक्याचे गतवैभव परत मिळण्यासाठी काही करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशी अपेक्षा व्यक्त केली.
जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी आपल्या भाषणात, दीड वर्षापूर्वी मला कार्यकारी अध्यक्षपद मिळाले मात्र या काळात मी पक्षाला न्याय देण्याचे काम केले, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालयात कार्यकर्त्यांची कामे केली. सुशीलकुमार शिंदे यांनी सांगेल त्या ठिकाणी बैठका घेतल्या तालुकानिहाय दौरे केले त्यामुळे जिल्हाध्यक्षपदासाठी माझे नाव पुढे आले पत्रकारांनी ही माझ्या नावाने वारंवार इच्छुक म्हणून बातम्या प्रसिद्ध केल्या परंतु मी कधीही जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक नव्हतो, धवलसिंहांचे नेतृत्व चांगले मिळाले आहे, घराण्याचा वारसा आहे त्यामुळे कुणीही गैरसमज करू नका धवलदादा, सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा दक्षिण तालुका काँग्रेसमय करण्याचा विश्वास हसापुरे यांनी व्यक्त केला.
सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले, आता या बैठका नंतर प्रत्येक तालुक्यात बैठका होतील, जिल्हा परिषद गट निहाय दौरे होतील, केवळ जिल्हा परिषद व पंचायत समिती धरून चालणार नाही तर आता 16 नगरपालिका आहेत, त्यांच्या निवडणुका आहेत, तिथं जावे लागेल, फिरावे लागेल, संघटन वाढवावे लागेल, त्यांचे नियोजन महत्वाचे आहे, गटतट बाजूला ठेवा अशा सूचना म्हेत्रे यांनी केल्या.
काय म्हणाले सिद्धाराम म्हेत्रे पहा
रामहरी रुपनर यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आता जिल्ह्यात मजबूत करायचे आहे, जरा दम धरा, दमबाजी करू नका, अजून लोंढा वाढणार आहे, शांत,संयमी रहावं लागेल, केवळ पदे मिळवण्यापेक्षा सर्वसामान्य माणसांची कामं, शासनाच्या विविध योजना माणसांपर्यंत पोहोचवाव्या लागतील, तेव्हा संघटन मजबूत होईल, पक्ष मोठा होईल.
शेवटी आपल्या भाषणामध्ये अध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील म्हणाले, प्रत्येक कार्यकर्ता मला महत्वाचा आहे, तो स्लिप वाटणारा असेल, बुथवर बसणारा असेल.आजची ओपनची जागा उद्या आरक्षित होईल, त्याठिकाणी तसा कार्यकर्ता तयार ठेवला पाहिजे, एवढ्याच बैठकांवर मी थांबणार नाही तर प्रत्येक पंचायत समिती गण, जिल्हा परिषद गटासह नगरपालिकांची शहरे आणि मोठ्या गावांमध्ये सर्व सेल, विभागांच्या बैठका घेणार आहे. माझे एकच लक्ष आहे पक्ष संघटन मजबूत करणे,माणूस जोडणारा कार्यकर्ता, जनाधार असलेल्या, ऍक्टिव्ह कार्यकर्त्याला संधी देणे.
धवलसिंह मोहिते पाटील यांचे भाषण पहा


















