कै.करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेतील शोकाकुलांवर लावण्यात आलेले ३५३ सह अन्य गुन्हे मागे घेऊन अटक केलेल्या शोकाकुलांची तातडीने सुटका करावी व मोची समाज बांधव राहणाऱ्या परिसरात पोलीस प्रशासनाकडून होत असलेली अयोग्य कारवाई व अटकसत्र त्वरित रोखण्यात यावे.अशी मागणी महाविकास आघाडी सरकार मुख समन्वय मा.शरद पवार आणि राज्य सरकारकडे करण्यात आली. तसेच पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईत अनेक निष्पाप व कष्टाळू लोक अडकले आहेत.त्यांच्यासाठी स्वतः च्या मानधनातुन आर्थिक मदत दिली असून या प्रकरणी शासन आणि प्रशासन दरबारी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी दिली.
ते बोलताना पूढे म्हणाले की, सोलापूर शहरात राहणारे मयत करण म्हेत्रे यांच्या अंत्य यात्रेत सहभागी झालेल्या २५० शोकाकुलांवर सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय प्रशासन मार्फत ३५३ सह अन्य कलमान्वये कारवाई सुरु आहे. हे प्रसंगोचित नाही.
कै. करण म्हेत्रे हे मोची समाजातील अग्रेसर सामाजिक कार्यकर्ते होते. सामाजिक कार्याच्या माध्यमातून प्रामुख्याने सोलापूर शहरातील लष्कर, बापुजी नगर, मोदी, फॉरेस्ट व अन्य परिसरात त्यांनी विषारी ताडीच्या विरोधात व्यसनमुक्ती आंदोलन करून अनेक तरुणांना दारू, ताडी, जुगार अशा वाईट प्रवृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी पुढाकार घेत असत. यामुळे अनेक तरुणांशी त्यांची मैत्री, सहानुभूती, प्रेमळ नाते संबंध निर्माण झाले होते. त्यांनी तरुणांनी निरोगी व सुदृढ शरीर कमविण्यासाठी व्यायाम केले पाहिजे. म्हणून व्यायाम शाळेची निर्मिती केली.
त्यांचे शनिवार दि. १५ मे २०२१ रोजी आकस्मित निधन झाले. यामुळे त्यांच्या कुटुंबियांना व मित्र परिवाराला आश्चर्याचा धाका बसला. सर्वजण भावनिक झाले. १६ मे रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून करण म्हेत्रे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अंत्ययात्रा निघाली. त्यावेळी त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्यासोबत मिळून काम केलेले अनेक तरुण आपसुकच शोकाकुल वातावरणात सहभागी झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला. या जन समुदायावर नियंत्रण न ठेवता आल्याने पोलिसांकडून हात उगारण्याचा प्रयत्न झाला.
त्याच दिवशी रात्री उशिरा पोलीस आयुक्तालय मार्फत अंत्य यात्रेत सहभागी झालेल्या २५० शोकाकुलांवर सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय प्रशासन मार्फत ३५३ सह अन्य कलमान्वये कारवाई सुरु केली. त्यानंतर करण म्हेत्रे हे ज्या परिसरात राहत होते तो संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले व तेथील स्थानिक लोकांवर पोलीस प्रशासनाचा दबाव वाढविला. सरसकट दिसेल त्या व्यक्तीला चौकशी करून ताब्यात घेऊ लागले. यामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार राजीव सातव यांच्या अंत्य यात्रेत हजारो नागरिकांचा जमाव होता. तो जमाव स्मशान भूमीतही त्याच संख्येने जमले होते. त्या जमावर पोलीस प्रशासनामार्फत कोणतीच कारवाई झालेली दिसून येत नाही. परंतु सोलापूर शहरातील अत्यंत कष्टाळू, पापभिरू, आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय मोची समाज आहे. या समाजातील कै. करण म्हेत्रे यांनी या समाजातील तरुणांसाठी केलेले व्यसनमुक्ती व सामाजिक कार्य नक्कीच प्रेरणादायी होते. त्याने प्रभावित होऊन अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या शोकाकुलांवर पोलीस प्रशासनाकडून होत असलेली धरपकडची कारवाई ही अनुचित आहे. एकंदरीत या कारवाईमुळे या समाजातील लोकांमध्ये पोलिसांकडून दडपशाही होत आहे. अशी संतप्त भावना व्यक्त होत आहे. वास्तविक पाहता कै. करण म्हेत्रे हे लष्कर परिसरात राहणारे असून त्यांच्या पार्थिवावर मोदी येथील स्मशान भूमी येथे अंत्य संस्कार करण्यात आले. परंतु पोलीस प्रशासनाकडून लष्कर, मोदी, फॉरेस्ट, थोरला इरान्ना वस्ती, धाकटा इरन्ना वस्ती इत्यादी परिसरातील नागरिकांवर सरसकट कारवाई सुरु आहे.
वरील वस्तुस्थितीचा आणि मोची समाज बांधवांच्या भावनाचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. तसेच सध्या सुरु असलेले अटक सत्र तातडीने रोखण्यात यावे. व अंत्ययात्रेतील शोकाकुलांवर लावण्यात आलेले ३५३ सह अन्य गुन्हे मागे घेऊन अटक केलेल्या शोकाकुलांची तातडीने सुटका करण्यात यावी या मागण्याचे निवेदन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी शरद पवार,राज्यपाल,मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहराज्यमंत्री,पालकमंत्री, पोलीस महासंचालक,जिल्हाधिकारी, सोमपा आयुक्त आदींना इमेल द्वारा पाठवल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.




















