सोलापूर : जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता पीडी कदम तसेच क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता अजनाळकर हे दोन्ही अधिकारी 31 मे रोजी एका दिवशी सेवानिवृत्त झाले. आता त्यांच्या जागेवर पदभार कोणाला जाणार याची उत्सुकता संपूर्ण जिल्हा परिषदेला होती.
जिल्हा परिषदेतील काही “पंडितांनी” त्यासाठी विविध नेत्यांच्या माध्यमातून फिल्डिंग लावली होती मात्र मनमिळावू स्वभावाचे आणि पदाचा अविर्भाव न बाळगणारे उप अभियंता सुनील कटकधोंड यांच्याकडे जिल्हा परिषद बांधकाम क्रमांक एकच्या कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार अखेर देण्यात आला आहे.
बुधवारी सायंकाळी त्यांनी पदभार स्वीकारला कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच कार्यकारी अभियंता क्रमांक दोन साठी कुर्डूवाडी भागातील उपअभियंता शफीक नाईकवाडी यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. त्यांनीही बुधवारी पदभार घेतला.
नाईकवाडी हे बार्शी शहरातील रहिवासी असून 1985 साली जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता पदावर रुजू झाले त्यांची तब्बल 37 वर्ष सेवा ही सोलापूर जिल्ह्यात झाली असून ज्या जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झालो त्याच जिल्हा परिषदेतील सर्वोच्च पद असलेल्या कार्यकारी अभियंता पदावर सेवानिवृत्तीच्या दोन महिन्यापूर्वी पदभार मिळाल्याने त्यांच्या चेहर्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. या दोन महिन्यात सर्वांना सोबत घेऊन चांगले काम करू अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.