सोलापूर : जुनी पेन्शन लागू करा, अशी मागणी करत राज्यभरातील सुमारे 18 लाख सरकारी कर्मचारी आज संपावर आहेत. मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचे सांगत आहेत. शासकीय-निमशासकीय कर्मचारी यांच्या संघटनेने हा बंद पुकारला आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये मंत्रालय, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, शासकीय रुग्णालये, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. असे असताना मंत्रालयातील कर्मचारी संपावर जाणार असल्याने त्याचा कामकाजावर गंभीर परिणाम होणार आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होणार आहे. संभाव्य ताण आणि रखडणाऱ्या कामांचा विचार करुन संपकरी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

















