सोलापूर : लिंगायत समाजातील युवा नेते उदयशंकर पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे सोलापुरातील राजकीय समीकरणे बदलली जाणार असल्याचे बोलले जात आहे. उदयशंकर पाटलांचा नेमका धोका नेमका कोणत्या देशमुखांना होणार असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान मंगळवारी झालेल्या उदय पाटील यांच्या प्रवेश कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील प्रमुख नेते माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख, माजी मंत्री आमदार विजयकुमार देशमुख, जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उदय पाटील यांचे स्वागत करताना सुभाष देशमुख म्हणाले, सोलापूर जिल्हा आता काँग्रेसमुक्त आणि भाजपयुक्त करायचा आहे. यामध्ये केवळ शहर मध्य, करमाळा व माढा हे मतदारसंघ आता भाजपमय करायचे आहेत. त्यासाठी उद्याशंकर पाटील यांनी राज्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तर सोलापूर जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काम करावे असा सल्ला दिला.
विजयकुमार देशमुख म्हणाले, उदय पाटील यांचे भारतीय जनता पक्षात मी स्वागत करतो पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि उभा राहणार. त्यांचे दोन्ही काका आमदार होते त्यामुळे त्यांच्या घरात जनतेची सेवा करण्याची परंपरा आहे. उदय पाटील यांचे सामाजिक कार्य मोठे आहे त्यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केल्याने निश्चितच सोलापुरात पक्षाची ताकद वाढली आहे.
सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, उदय पाटील हे सोलापुरातील मोठे नेते आहेत त्यांचे संघटन कौशल्य दांडगे आहे. यापूर्वी सोलापुरातील भारतीय जनता पार्टीमध्ये विजयकुमार देशमुख, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी आणि मी स्वतः लिंगायत समाजाचे होतो परंतु आता उदय पाटील यांच्या रूपाने पक्षाला आणखी एक चेहरा मिळाला आहे तीनचा आकडा पार करून चार झाला आहे हे शुभचिंतक मानले जाते त्यामुळे पक्षाचे बळ वाढणार आहे.


















