सोलापूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागासह शिक्षण व ग्रामपंचायत विभागातील पेन्शनचे एकही प्रकरण जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवल्याचे दिसून आले तर त्या कर्मचाऱ्याला थेट निलंबित करेन असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर आता मला अशा काही कामचुकार कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल सुद्धा करेन अशीही तंबी त्यांनी भरली आहे.
सीईओ स्वामी यांनी सोमवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात आरोग्य विभागाचा आढावा घेतला. शिक्षणाधिकारी लोहार यांच्या लाच प्रकरणानंतर जिल्हा परिषदेच्या कामकाजाची मोठी बदनामी झाली आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारी पुढे आल्या. यात शिक्षण, आरोग्य व ग्रामपंचायत विभागाच्या तक्रारींचा समावेश आहे. दरम्यान जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या आरोग्यसेविका मनीषा जाधव यांना राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार मिळाला त्याबद्दल सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी स्वामी यांनी उपस्थित कर्मचारी अधिकाऱ्यांना उपदेशाचे चांगलेच डोस दिले. कार्यालयातील सिस्टीम सुधारा, एकमेकांबद्दल उणेधूने काढू नका, नागरिकांची कामे का वाढवता ही प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे. सात दिवसांच्या वर फायली टेबलावर पेंडिंग राहिल्या नाही पाहिजे.
उद्या तुम्ही सुद्धा रिटायर्ड होणार आहेत, त्यामुळे कुणाच्याही पेन्शनच्या फाईल अडवू नका, यापुढे मला एकही पेन्शनची फाईल जाणीवपूर्वक अडवल्याचं निदर्शनास आलं तर त्या कर्मचाऱ्याला थेट निलंबित करेन. आणि येत्या काही दिवसात आरोग्य विभागातील आठ ते दहा जणांचा ठरवून कार्यक्रम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक पीएचसी मध्ये मला मनीषा जाधव सारख्या काम करणाऱ्या कर्मचारी हव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


















