सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख हे अनेक महिन्यानंतर पाणंद रस्ते करण्याच्या बैठकीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आले होते. जिल्हा परिषदेमध्ये दाखल होताच प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी देशमुख आणि कोहीनकर यांच्यात बराच वेळ अँटी चेंबरमध्ये चर्चा झाली. चर्चा होऊन बाहेर पडताना सुभाष देशमुख यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ते हसत हसत बाहेर आले.
मागील दोन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाअंतर्गत चालणाऱ्या जलजीवन मिशन योजनेच्या कारभारावर तोफ डागत तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांच्या कारभारावर संताप व्यक्त केला होता. त्यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोळी यांची चौकशी लावली होती जल जीवन मिशन योजनेत झालेल्या गैरकारभारावरून बापूंनी कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांना अखेर सोलापुरातून हाकलून लावलेच.
त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता पदाचा पदभार सुनील कटकधोंड यांना देण्यात सुद्धा सुभाष देशमुख यांनीच मध्यस्थी केल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेमध्ये बापू आल्याचे समजतात कार्यकारी अभियंता कटकधोंड यांनी आवर्जून त्यांची भेट घेतली. जिल्हा परिषदेमध्ये बऱ्याच गोष्टी आमदार देशमुख यांना अपेक्षित होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

















