सातारा : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील नवोदित पत्रकारांसाठी मोठं वक्तव्य करताना नव्या पत्रकारांना सुरुवातीचे काही वर्षे सरकार कडून स्टायफंड देता येईल का? त्यासाठी सरकार प्रयत्न करेल असे आशावाद व्यक्त केला आहे.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन सातारा जिल्ह्यातील पुस्तकाचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिलार या गावी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. हे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार जयकुमार गोरे यांच्यासह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक सातारा जिल्हा संघटनेची सर्व टीम उपस्थित होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देशातील या पहिल्या डिजिटल मीडियाचे उद्घाटन होणार होते मात्र त्यांचा महत्वाचा नंदुरबार दौरा असल्याने त्यांनी ऑनलाइन शुभेच्छा देत पत्रकारांचे सर्व प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
अधिवेशनाचे उद्घाटक नामदार चंद्रकांत पाटील म्हणाले, पत्रकार हा समाज व राज्यकर्त्यांना धडा शिकवणारा व दिशा देणारा घटक आहे. पत्रकारांच्या अधिस्वीकृती या विषयावर चर्चा होणं, बैठका होणं गरजेचं आहे, राहायला घरे, त्याच आरोग्य, मुलांचं शिक्षण अशा सुविधा वाढविल्या पाहिजेत, पत्रकाराच्या सुरुवातीचे काही वर्षे त्याला सरकार स्टायफंड देता येईल का, यासाठी संघटनेची मदत व्हावी, एकत्र बसून दर तीन महिन्यांनी सरकार सोबत बसून प्रश्नांवर चर्चा करूया असा आशावाद व्यक्त केला.
आजकाल अपशब्द, शिव्या दाखवल्या जातात, तुमच्यात समन्वय ठेवा, चुकीच्या बातम्या दाखवू नका. आता पद्मभूषण व पद्मश्री पुरस्कार जाहीर होतील त्यांच्या डॉक्युमेंटरी तयार करा, पैसे सरकार देईल. सारखे संजय राऊत, एकनाथ शिंदे नका दाखवू आम्हाला, समाजात लपलेल्या लोकांना समोर आणा असे आवाहन त्यांनी केले.


















