सोलापूर : राज्यभरातील 2200 नायब तहसीलदार आणि 600 तहसीलदार यांनी 3 एप्रिल पासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. राजपत्रित वर्ग-2 नायब तहसीलदार या कार्यकारी पदाच्या विद्यमान ग्रेड-पे मुद्यावरुन हा संप पुकारण्यात आला आहे. सोलापुरात काम बंद आंदोलनाचा दुसरा दिवस होता त्यामुळे प्रशासकीय पातळीवरील बरीच कामे ठप्प झाल्याचे पाहायला मिळालं.
राज्य सरकारने 13 ऑक्टोबर 1998 रोजी नायब तहसीलदार संवर्गाचा दर्जा वर्ग तीनवरुन वाढवून वर्ग दोन केला होता. मात्र वेतनवाढ केली नव्हती. मागील 25 वर्षांपासून राज्यातील नायब तहसीलदार वर्ग दोन या पदावर काम करतात,मात्र वर्ग तीनचे वेतन घेत आहेत. त्यामुळे नायब तहसीलदारांनाही इतर विभागांतील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांएवढा ग्रेड पे वाढवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केली आहे.
नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचे असले,तरी या पदाला इतर विभागांतील समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळते. त्यामुळे ग्रेड पे 4300 रुपयांवरुन 4800 रुपये वाढवण्याची मागणी शासनाकडे केली असल्याचे तसेच यासंदर्भात महसूल मंत्र्यांसोबत राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची आज रोजी चर्चा झाल्याचेही दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार अमोल कुंभार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

















