सोलापूर सांगली व सोलापूर विजापूर दरम्यान चार पदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. सोलापूर मंगळवेढा रोडवर सीना नदीवर तिर्हे व य बेगमपूर या ठिकाणी भीमा नदीवर आणि सोलापूर विजापूर रोडवर सीना नदीवर वडकबाळ तसेच टाकळी जवळ भीमा नदीवर बॅरेज कम बंधारे बांधण्याची भूमिका तत्कालीन सहकारमंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी मांडली होती. याविषयी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांच्या कडून या विशेष कामासाठी मंजुरी आणली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. आता या दोन्ही महामार्गाचे काम सुरू आहे आणि त्यांनी प्रयत्न केल्याप्रमाणे सीना नदीवर तिऱ्हे व वडकबाळ याठिकाणी बॅरेज कम बंधारे बांधण्याची मंजुरी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून मिळाली आहे.
दक्षिण सोलापूर तालुका आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी फायदेशीर बाब आहे, या बंधाऱ्यांमुळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात थांबेल आणि याचा फायदा शेतकऱ्यांना शेती आणि पिण्यासाठी होणार आहे.
या दोन्ही बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे करण्यासाठी सुभाष देशमुख प्रयत्नशील आहेत, तिर्हे या गावात त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते मात्र भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सोलापुरचे वाबळे या अधिकाऱ्याने हा कार्यक्रम शासकीय होऊ शकत नाही असे सांगितल्याचे बोलले जात आहे.,
ही माहिती जेव्हा आमदार सुभाष देशमुखांना समजली तेव्हा त्यांनी प्रकल्प संचालक संजय कदम यांना संपर्क केला असता कदम यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही दरम्यान गुरुवारी तिर्हे गावचे मोहिते पाटील समर्थक भाजप कार्यकर्ते यांनी याबाबत आमदार बापूंकडे तक्रार केली, हा विषय सुभाष देशमुख यांच्या अस्मितेचा असल्याने त्यांनी पुन्हा संजय कदम यांना फोन केला, फोन उचलल्यानंतर बापूंनी आपला संताप कदम यांच्यावर व्यक्त केल्याचे समजले, फोन न उचलणे, फोन स्विच ऑफ ठेवणे, फोन कट करणे, हे काय नाटकं लावली आहेत, मी नितीन गडकरी साहेब तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे, शासकीय कार्यक्रम कसा होऊ शकत नाही?तुम्ही जिल्ह्यातील सर्व आमदार खासदारांना निमंत्रण द्या, माझी हरकत नाही अथवा कुणाला विरोध नाही, पण तुमचं जे चाललंय ना ते योग्य नाही? यासह बापूंनी आजपर्यंत असे कोणत्या अधिकाऱ्यावर एवढं चिडले नाहीत अशा शब्दात त्यांनी संजय कदम यांना फैलावर घेतल्याची माहिती मिळाली.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण हा विभाग आमदार सुभाष देशमुख यांचे नेते नितीन गडकरी यांच्या खात्याचा असतानाही त्याच विभागाचे प्रकल्प संचालक संजय कदम हे या कार्यक्रमाला निरुत्साह दाखवत आहेत, कदम यांनी नियोजन करू अथवा न करू हा कार्यक्रम शुक्रवारी करणारच अशी भूमिका सुभाष बापूंची असल्याचे समजले. मागील काही दिवसांपूर्वी गडकरी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या एका उपजिल्हाधिकाऱ्याला शासनाने थेट निलंबित केले, याच पार्श्वभूमीवर कदम यांनी तक्रार गडकरी यांच्याकडे भाजप कार्यकर्ते करणार असल्याचे बोलले जात आहे.


















