सोलापूर : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री, दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांचा 12 मार्च रोजी वाढदिवस. तसे ते बापू वाढदिवस साजरा करीत नाहीत. त्यांनी वाढदिवसादिवशी बुके, गुच्छ न आणता त्याऐवजी निराधारांसाठी चालवल्या जाणाऱ्या लोकमंगल अन्नपूर्णा योजनेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.
दिवसभर आपल्या विकास नगर येथील कार्यालयात आमदार सुभाष बापू यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. आपल्या लाडक्या नेत्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी आपल्या पद्धतीने लोकमंगल अन्नपूर्णा योजनेला सहकार्य केले. काहींनी गहू तर काहींनी तांदूळ दिले, काहींनी तेल तर काहींनी पिठाची चक्की मशीन वाढदिनी भेट दिली.
बापूंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यत्नाळच्या राधाकृष्ण बंडगर या कार्यकर्त्याने 50 ग्रामस्थांना देवदर्शन घडवून आणले. सायंकाळी ते आपल्या निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारत होते, याचवेळी काही पत्रकारांनी त्यांना वाढदिनी शुभेच्छा दिल्या. तेव्हा वाढदिनी यंदा संकल्प काय असा प्रश्न पत्रकारांनी केला.
आमदार देशमुख म्हणाले, आज शिक्षणाचा बाजार झालाय असा आरोप केला जातोय तो खोडून काढण्यासाठी वडाळा येथील लोकमंगल कॉलेज मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे फी घेतली जाणार नाही असा संकल्प आम्ही केला आहे.
त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील नुकतेच कणेरी मठामध्ये मी जाऊन आलो. त्या ठिकाणचे वातावरण आणि पर्यावरणाचे चित्र पाहता कणेरी मठाच्या धरतीवर सोलापूर जिल्ह्यातील शंभर गावे समृद्ध करण्याचा माझा संकल्प आहे. संपूर्ण जिल्ह्यामधून ही शंभर गावे असतील त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन देशमुख यांनी केले.





















