सोलापूर : अक्कलकोट आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली. त्यानंतर ते पक्षनेते अण्णाराव बाराचारे त्यांच्या कार्यालयात बसले. दरम्यान बाहेर पडताना पत्रकारांशी त्यांनी गप्पा मारल्या.
काही दिवसांपूर्वी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मतदार संघात थांबविण्यात आलेल्या रस्त्यांची कामे पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. यावेळी ही कामे आमदार कल्याणशेट्टी यांच्या सांगण्यावरून थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली. याच विषयावर कल्याणशेट्टी यांना छेडले असता त्यांनी मी असे कधीच करणार नाही, सचिन कल्याणशेट्टी हा प्रत्येक काम ‘कॉलिटी’चा करणारा माणूस आहे.
मी कुणाला अडवले नाही मात्र कोणाच्या पोटात दुखतयं त्याला मी काय करणार या भाषेत त्यांनी विरोधकांना चिमटे काढले. मंगळवारी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन मध्ये पाटबंधारे विभागाची बैठक झाली. या बैठकीत अक्कलकोट मतदार संघातील एकरुख उपसा सिंचन व देगाव उपसा सिंचन या दोन योजना आणि कुरनूर धरण यांच्या देखरेखीसाठी मनुष्यबळाची कमतरता आहे त्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी महाविकासआघाडी पूर्ण ताकतीने या निवडणूक लढणार आहे त्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट विधानसभा मतदार संघात रणनीती काय असेल असा प्रश्न केला असता भारतीय जनता पार्टी स्वबळावर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढवणार आणि भाजपचा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकणार असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
















