सोलापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी भाजप स्वतंत्र निवडणूक लढवत असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती झाली आहे.
सत्ताधाऱ्यांमध्येच शह काटशह चे राजकारण पहायला मिळत आहे.

2017 च्या महापालिका निवडणुकीत एकत्र निवडून आलेले विद्यमान आमदार देवेंद्र कोठे आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आता एकमेकांचे विरोधक आहेत.
अमोल शिंदे यांनी युतीसाठी बराच प्रयत्न केला पण पालकमंत्री गोरे आणि आमदार कोठे यांनी प्रतिसाद दिला नाही.
म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती झाली. जागा वाटपामध्ये आमदार देवेंद्र कोठे यांच्या आत्या माजी नगरसेविका कुमुद अंकाराम यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी प्रभाग तीन मधून शिंदे सेनेची उमेदवारी घेतली. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना अमोल शिंदे यांनी कोठेंना हिणवताना ज्यांनी साथ सोडली त्यांच्या पाठीशी शिवसेना असल्याचे सांगत डिवचले होते. त्या उमेदवारीची सोलापुरात चर्चा झाली.
दरम्यान उमेदवारी अर्ज माघार घ्यायच्या दिवशी कुमुद अंकाराम या दुपारी बारा वाजता दिसून आल्या. त्यांनी प्रभाग दहा आणि अकरा मधूनही अर्ज दाखल केला होता. अनेकांना वाटले त्या 10 आणि अकराची माघार घ्यायला आल्या. पण अडीच नंतर स्वतः आमदार देवेंद्र कोठे, विनायक कोंडयाल हे कुमुद अंकाराम यांना घेऊन आले. अंकाराम यांच्या डोळ्यात पाणी होते. शेवटी त्यांनी आपली प्रभाग तीन मधील सेनेची उमेदवारी मागे घेतली.
आमदार कोठे यांनी ही माघार घेत शिवसेनेच्या अमोल शिंदे यांना थेट शह दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.




















