सोलापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील ३९ कंत्राटी परिचारिकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश आरोग्य अभियानाचे सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना दिले आहेत. सेवा समाप्तीचे आदेश मागे घेऊन पुन्हा सेवेत घ्यावे आशी मागणी परिचारकांनी केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात सध्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत २१२ कंत्राटी परिचारिकांची पदे मंजूर आहेत . त्यापैकी यंदाच्या आर्थिक वर्षात १७३ पदांनाच मान्यता देण्यात आली असून ३९ परिचारिकांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र शासन पातळीवरूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याने यासंदर्भात सोलापूर जिल्हा परिषद प्रशासन काहीच करू शकत नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सह जिल्हा आरोग्य अधिकारी हातबल झाले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात ४३१ आरोग्य उपकेंद्र आहेत. या उपकेंद्रात मागील वर्षापासून ग्रामीण भागातील महिलांच्या प्रस्तुतीचे शून्य टक्के प्रमाण आहे. अशा उपकेंद्रातील परिचारिकांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वतीने घेण्यात आला आहे. २००७ ते २०१० या कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्यात कंत्राटी तत्त्वावर परिचारकांची भरती करण्यात आली होती. २०२२ -२३ च्या या आर्थिक वर्षात प्रकल्प अमलबजावणी आराखड्यात मंजूरी नाकारल्याने या परिचारिकांची सेवा समाप्त करण्यात येणार आहे.
दरम्यान या परिचारिकांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर शितल जाधव यांनी भेट घेऊन याबाबत विचारले तेव्हा केंद्र शासनाच्या आदेशानुसार कारवाई केंद्र शासनाच्या आदेशानुसार ३९ परिचारकांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसुतीचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणावरील परिचारिकांची सेवा समाप्ती करण्यात आली असल्याचे जाधव यांनी त्यांना सांगितले.


















