सोलापूर : महाराष्ट्र धनगर समाज महासंघ सोलापूर शहर व जिल्हा शाखेच्या वतीने धनगर समाज कार्यकर्त्यांची बैठक माजी मंत्री अण्णासाहेब डांगे व माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्या प्रमुख उपस्थितीत विजापूर रोडवरील सुंदर मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी घेण्यात आली.
या बैठकीला शाखेचे शहराध्यक्ष प्रशांत फत्तेपुरकर, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शेळके, माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, वसंत पाटील, विलास पाटील, मनीषा माने, शेखर बंगाळे, दत्तात्रय जम्बल, प्रा.मदने यांच्यासह धनगर समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. …
अण्णासाहेब डांगे म्हणाले, धनगर समाज हा सर्व क्षेत्रामध्ये आणि सर्व पक्षांमध्ये विखुरलेला आहे, त्यामुळे राजकीय जोडे बाजूला ठेवून समाजाने आता एकत्र येण्याची गरज आहे, आज पर्यंत सर्वच पक्षांनी आपणाला फसवले आहे, समाज म्हणून प्रत्येकाने लढाई लढण्याची गरज आहे. आपण कुणाला भीक मागत नाही, राज्य घटनेने दिलेले हे आरक्षण आहे. समाजातील युवक व ज्येष्ठांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले, धनगर समाज पूर्वी मेंढपाळ होता पण आता समाजात बदल झाला असला तरी आरक्षण आणि समाजाचे औद्योगिकरण गरजेचे आहे. त्यासाठी एकत्रित होऊन मेळावा आणि बैठका वाढवा असे ही ते म्हणाले. …
बाळासाहेब शेळके म्हणाले, सत्तेमध्ये जो वाटा पाहिजे, ते मिळत नाही, सत्तेत जाण्याचा मार्ग बंद झाला आहे, म्हणून आरक्षण पाहिजे, दत्तामामा भरणे एकमेव आमदार आहेत,महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेत आमचा एक प्रतिनिधी घ्या, पण होत नाही, संघटित पणा कमी पडतो, संघर्ष केला जात नाही. पुन्हा तो संघर्ष उभा करावा. …
माजी आमदार रामहरी रुपनवर म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळते तर आपणास का नाही? सरकारवर दबाव टाकण्यास कमी पडलो. आपली फसवणूक झाली. मात्र असलेले आरक्षण रद्द होत आहे, तुम्ही आम्ही काय केले, केवळ रस्त्यावर उतरलो, धनगर आरक्षण काय कुणाला माहिती आहे का? ते समजून सांगावे लागेल, अभ्यासपूर्ण मांडावे लागेल.

















