सोलापूर : अखिल विश्व वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविले असून माघवारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील कुरुल पंढरपूर रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी केली आहे.
गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी पंढरपूरची माघवारी पुढील महिन्यात येत आहे. या वारीसाठी असंख्य लाखो अबाल वृद्ध वारकरी पायी चालत पंढरपूरकडे येत असतात. मात्र सोलापूर जिल्हयातील कुरुल-पंढरपूर रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे वारकऱ्यांची गैरसोय होत आहे. हा रस्ता दुरुस्त करून वारकऱ्यांची वारी सुखकर करावी.
येत्या ४ नोव्हेंबर रोजी कार्तिकी वारी झाली तसेच अवघ्या दोन ते अडीच महिन्यांवर माघवारी आहे. तरी या रस्त्याचे कामकाज अत्यंत धीम्या गतीने चालू आहे तसेच येणारी माघवारी लक्षात घेता रस्त्यावरील पडलेले खड्डे डांबर टाकून दुरुस्त करावेत सदर रस्त्यावरील कुरूल, अंकोली, सुस्ते, तारापूर, टाकळी, पंढरपूर असा हा 25 किलोमीटरचा रस्ता खूपच दयनीय आहे. तेथील ग्रामस्थ हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करीत आहेत, या संदर्भात खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांनाही निवेदन दिले आहे. त्यांनी हा विषय अधिवेशनामध्ये मांडणार असे सांगितले होते पण ते काम अद्याप झालेले नाही.
आता आपल्या रूपात खरे हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर आले आहे असा आमचा विश्वास असल्यामुळे आपणाकडे या रस्त्याबाबत आम्ही ही तक्रार मांडलेली आहे, तरी या रस्त्याची दुरुस्ती आम्हाला आपल्याकडून अपेक्षित आहे तरी लवकरात लवकर हा विषय मार्गी लावून संबंधित विभागाला सूचना द्याव्यात व समस्त वारकर्याचा आशीर्वाद हिंदुत्ववादी सरकारला मिळवून दयावा अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.


















