सोलापूर : माझी वसुंधरा अभियान व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त काल संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमांची पाहणी करण्यासाठी सीईओ स्वामी हे अक्कलकोट दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी अक्कलकोट डॉ. अश्विन करजखेडे अनुपस्थित होते.
त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी व इतर कामकाजाचा आढावा घेण्याच्या कामात अडचणी निर्माण झाल्याच्या कारणाने सीईओ स्वामी यांनी डॉ. अश्विन करजखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
त्याचप्रमाणे सीईओ स्वामी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र चपळगाव येथे भेट दिली असता वैद्यकीय अधिकारी डॉ. काशिनाथ हारकुडे यांना वैद्यकीय चाचणी मशीन (क्लाऊड मशीन) चा वापर करता आला नाही. त्याचप्रमाणे औषधे उपलब्धता रजिस्टर बाबत समाधानकारक उत्तरे देता आले नाहीत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एकंदरीत कामकाजात बेशिस्तपणा दिसून आल्याबद्दल आपणास निलंबित का करू नये म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सीईओ स्वामींनी केलेल्या या कारवाईमुळे आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बैठका व व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सीईओ स्वामी यांनी प्रशासकीय कामकाजात सुधारणे विषयी अनेक वेळा सूचना व कारवाईचे इशारे दिले होते तरीही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा दिसून येत नाही हे लक्षात आल्यानंतर आता सीईओ स्वामी यांनी कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली असल्यामुळे जिल्हा परिषदेत खळबळ माजली आहे.

















