अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे व इतर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्याची नोटीस जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने जिल्हा परिषदेला देण्यात आली.
दरम्यान ‘कोण म्हणंतय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘आवाज दो, हम सब एक है’, अशा घोषणा देत सोलापुरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष सूर्यमनी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला.
नेमक्या काय आहेत मागण्या
अंगणवाडी सेविकांना दरमहा २६ हजार रुपये मानधन द्या, मदतनिसांना २२ हजार रुपये मानधन सुरू करा, महागाई निर्देशांकाला जोडून सहा महिन्यांनी मानधनात वाढ करा, विमा योगदान मासिक निर्वाह भत्ता सेवा समाप्तीनंतर देण्याचा प्रस्ताव महिला व बालविकासमंत्र्यांनी मान्य केला आहे. तो नाेव्हेंबर अखेरपर्यंत तयार करून हिवाळी अधिवेशनात मंजूर करा, महानगरपालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यांसाठी ५ ते ८ हजार रुपये भाडे मंजूर करा, आहाराचा दर सर्वसाधारण बालकांसाठी १६, तर कुपोषित बालकांसाठी २४ रुपये करा, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या; पण या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे.
इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना भरघोस व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुटपुंजी वाढ का? सरकार नेहमीच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सावत्रपणाची वागणूक देत आहे.
त्यामुळेच ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या मोर्चात दीड हजारांहून अधिक अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच मासिक बैठकीवर बहिष्कार संपाच्या आधी नोव्हेंबरमधील मासिक प्रगती अहवाल, मासिक बैठक व इतर कोणतीही माहिती देण्यावर बहिष्कार टाकणार असल्याचे संघाने सांगितले.