सोलापूर : सोलापूर मधील एमआयएम पक्षाच्या सध्या कोणत्याही घडामोडी नाहीत. आगामी महानगरपालिका असेल किंवा लोकसभा विधानसभा यासाठी कोणतीही पक्षांतर्गत संघटनेची तयारी दिसून येत नाही. पक्षाचे शहराध्यक्ष फारूक शाब्दी हे तर महिन्या दोन महिन्याला एकदा सोलापूरमध्ये येऊन जातात. आपल्या पैशाच्या जोरावर कुठलातरी इव्हेंट करतात आणि त्याच्या प्रसिद्धीच्या धुंदीमध्ये काही दिवस ते राहतात असे काहीही चित्र एमआयएम पक्षामध्ये आहे.
तोफिक शेख हे पक्षामधून बाहेर पडल्यानंतर संपूर्ण एमआयएम पक्ष फारूक शाब्दी यांनी ताब्यात घेतला त्यांना माजी नगरसेवक गाजी जहागीरदार यांनी मोठी मदत केल्याचे दिसून आले. एमआयएम मध्ये असलेले दहा नगरसेवक त्यातील बरेच नगरसेवक इतर पक्षाच्या संपर्कात आहेत. ठराविक दोन-तीन नगरसेवक शाब्दी सोबत असल्याचे दिसून येते.
महिला आघाडीच्या अध्यक्षा रेश्मा मुल्ला या सुद्धा आता सक्रिय दिसत नाहीत. कधी कधी त्या निवेदन वगैरे देताना दिसत होत्या परंतु आता महिला आघाडीच्या हालचाली दिसत नाहित. काही चमको कार्यकर्ते हे शाब्दी आले तरच त्यांच्या मागे मागे फिरतात अन्यथा ते काँग्रेस आमदारांच्या कार्यक्रमात ही दिसून येतात. एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी त्यांना याबाबत विचारले असता “मामू अपने को तो माल मिलता है टेन्शन नही लेने का” असे उत्तर त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
2017 साली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षात महत्त्वाची भूमिका बजावणारे कोमारो सय्यद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये नाराज होऊन एमआयएमची वाट धरली आहे. सय्यद हे अनुभवी आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा अजूनही शाब्दी यांना करून घेता आलेला नाही उगीच एमआयएम मध्ये आलो बाबा अशा भावनेमध्ये सय्यद असल्याचे बोलले जाते.
पक्षाचे जिल्हा निरीक्षक अन्वर सादात यांचे सोलापूरकडे अजिबात लक्ष नाही. पक्षाची कार्यकारिणी अद्यापही करण्यात आलेली नाही. निवडी रखडल्या आहेत. पक्ष संघटनवाढीकडे लक्ष देणे, नवीन आलेल्या कार्यकर्त्यांना पदे देणे याकडे अन्वर सादात यांचे लक्ष नसल्याचे दिसून येते. आता तर निरीक्षक बदलावा अशी मागणी होत आहे.
आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने आता सक्रिय होणे गरजेचे आहे. मुस्लिम समाजामधील युवकांमध्ये अजूनही एमआयएमची क्रेझ दिसून येते. निवडणुका आल्या की हैदराबादचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट असोसुद्दिन ओवेसी, आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्या जीवावरच या निवडणुका लढायच्या का? स्थानिक नेत्यांची जबाबदारी नाही का? असे अनेक प्रश्न एमआयएम पक्षाचे सामान्य कार्यकर्ते विचारत आहेत.