सोलापूर दि. 24 (जि.मा.का.):- चंद्रभागाबाई यलगुलवार शाळेतील शिपाई हनुमंत विठ्ठल काळे यांनी 10 ऑगस्ट 2023 रोजी मागील 12 वर्षापासून चुकीचा शालार्थ आयडी दिल्याने पगार मिळत नाही म्हणून शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली होती. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन मयताची पत्नी श्रीमती सुनीता हनुमंत काळे यांना तात्काळ अनुकंपा तत्वावर त्याच शाळेत शिपाई सेवक पदावर भरतीचे आदेश दिले होते.
कै. हनुमंत काळे यांनी तळ्यात उडी मारून आत्महत्या केल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे व जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांना याबाबत चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून याची चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मयत हनुमत काळे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना प्रशासनाच्या वतीने सर्व प्रकारची मदत देण्याबाबत आश्वासित केले होते. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाच्या पुणे उपसंचालक कार्यालयाने मयत हनुमंत काळे यांच्या पत्नी श्रीमती सुनीता हनुमंत काळे यांना त्याच शाळेत शिपाई सेवक या पदावर अनुकंपा तत्वावर भरती करून घेतले. तसेच त्यांचा शालार्थ आयडी ही अत्यंत गतिमान पद्धतीने देण्यात आला. तर शिक्षण विभागाच्या दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजीच्या आदेशान्वये मयत हनुमंत काळे यांचे माहे सप्टेंबर 2011 ते 8 ऑगस्ट 2023 पर्यंतचे थकीत वेतन करण्यास मान्यता दिलेली आहे.
दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीत मयत हनुमंत काळे यांचे प्रलंबित वेतन व त्यांच्या पत्नीला अनुकंपावर नोकरी मिळवून देण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालून मयत काळे यांच्या कुटुंबीयांना कशा पद्धतीने लवकरात लवकर न्याय मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न केले. मयत काळे यांचा शालार्थ आयडी तात्काळ देण्याबाबतचे निर्देश शिक्षण उपसंचालक यांना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले. त्यामुळे शासनाने मयत काळे यांचे थकीत असलेले बारा वर्षाचे वेतन देण्याचे आदेश नुकतेच दिलेले आहेत.
तसेच मयताच्या पत्नीला त्याच शाळेत त्याच पदावर अनुकंपा तत्वावर भरती करण्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाला सुचित करण्यात आले व जिल्हा परिषद शिक्षण विभागाने त्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करून मयत हनुमंत काळे यांच्या पत्नीचाही शालार्थ आयडी अत्यंत कमी कालावधीत प्राप्त झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या घटनेची घेण्यात आलेली दखल व यासाठी करण्यात आलेला पाठपुरावा यातून दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीत मयत हनुमंत काळे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडण्यात आली.