सोलापूर : राजकीय पक्ष आणि पदांसाठी इच्छुक दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. याचाच विचार करून सर्वात प्रथम शिवसेनेने आपल्या जिल्हाप्रमुखांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. तीन तालुक्याला एक जिल्हाप्रमुख अशी नेमणूक प्रथम शिवसेनेने केली त्यामुळे अनेक इच्छुक कार्यकर्त्यांना संधी मिळाली. त्यावरच भारतीय जनता पार्टीने सुद्धा रेघ ओडताना एवढ्या मोठ्या पक्षानेही अखेर निर्णय घेऊन टाकला. सोलापूर जिल्ह्यात त्यांचे आता दोन जिल्हाध्यक्ष आहेत. माढा लोकसभा मतदारसंघ व सोलापूर लोकसभा मतदारसंघांनुसार त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची नेमणूक केली आहे. तीच मागणी आता काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते करू लागले आहेत.
काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातील असून त्यांचा व्याप मोठा आहे, त्या भागात धवलसिंह मोहिते पाटील यांचे मोठं राजकीय जाळे आहे, कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. त्यामुळे त्यांच्यावर असलेली जबाबदारी पाहता सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी दोन जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्षाने करावेत अशी मागणी आता सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्ते करू लागले आहेत.
काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार आता आमदार ताईंचे आपल्या लोकसभा मतदारसंघात दौरे सुरू होत आहेत. ग्रामीण भागामध्ये जाताना त्यांना निश्चितच आपल्या जिल्हाध्यक्षाची साथ मिळणे महत्त्वाचे आहे. सोलापूर लोकसभेमध्ये त्यांनी विजय मिळवला तर निश्चितच शहर मध्य सोबत अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि जवळ जवळ मोहोळ विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते. मोहोळ तालुक्यातील एक बडा नेता काँग्रेसच्या संपर्कात असून त्यांनी काँग्रेस प्रवेश केला तर त्यांच्याही गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी जाण्याची चर्चा ऐकण्यास मिळते.
भारतीय जनता पार्टीने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावरील वाढती जबाबदारी आणि व्याप पाहता दोन जिल्हाध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला. माढा मतदारसंघांमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातील अंतर्गत वाद शमवण्यासाठी पक्षाने सांगोल्याचे केदार यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ घालून सर्वांनाच गप्प केले, त्याच पद्धतीने काँग्रेस पक्षाने धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर माढा लोकसभेची जबाबदारी देऊन सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी नवा जिल्हाध्यक्ष नेमावा अशा मागणीने आता जोर धरला असून काँग्रेस पक्षाकडून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली.