मंद्रुप : महाराष्ट्र शासन नियोजन विभागाच्या कल्याणकारी राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुला मुलींची शाळा येथे शुक्रवारी २६ मे रोजी ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत योजना कल्याणकारी ‘ सर्वसामान्यांच्या दारी या अभियानाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांनी केले नंतर खासदार डॉक्टर जयसिध्देश्वर स्वामी यांनी उपस्थिती लावली. प्रांताधिकारी संजय देशमुख, तहसिलदार राजशेखर लिंबारे यांच्या उपस्थितीत यावेळी विविध योजनांचे हजारों दाखले, प्रमाणपत्र, मंजुरी पत्र यांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे शासनाचे सर्व विभाग याठिकाणी उपस्थीत होते. परिसरात शासनाच्या सर्व विभागांच्या योजनांची माहिती मिळावी म्हणून स्टॉल लावण्यात आले होते. या कार्यक्रमाला दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली.
तहसिलदार लिंबारे म्हणाले, अनेक वेळा लोकांना शासनाकडून देय असलेल्या योजनांची माहिती न मिळाल्याने योजनांचा फायदा गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही . त्यामुळे या योजनेचा उद्देश सफल होत नाही. म्हणून या अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय योजनेशी निगडित कार्यालयाचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे.
लिंबारे यांनी स्वतः साठी एक माफक अपेक्षा व्यक्त केली. ती म्हणजे मंद्रूप तहसीलदारला नवीन वाहन, चालक आणि कार्यालयात शिपाई शासनाने द्यावा. सुभाष देशमुख हे सहकार मंत्री असताना त्यांनी मंद्रूपसाठी स्वतंत्र तहसील कार्यालय मंजूर केले होते. त्यामुळे याही बाबींचा पाठपुरावा ते करतील अशी अपेक्षा आहे यांनी व्यक्त केली.


























