मंगळवेढा : पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील माण नदीकाठच्या गावांना टेंभू योजनेचे पाणी सोडण्यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दुष्काळी परिस्थितीमुळे उजनीत पाणी नसल्याने टेंभूचे पाणी माझ्या मतदारसंघातील माण नदीकाठच्या गावांना द्या त्याचबरोबर म्हैसाळ योजनेच्या पाण्याबाबतही अनेक तक्रारी असून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याच्या सूचना द्या अशी मागणी केली होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेंभू योजनेचे सचिव दीपक कपूर यांना माण नदीवरील सर्व बंधारे भरून घेण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेच्या अडी-अडचणी व समस्या जाणून गेल्या पंधरवड्यात तालुक्याचा गावभेट दौरा केला होता.
या दौऱ्यामध्ये नदीकाठच्या परिसरातही भीषण पाणीटंचाई असून उजनीत पाणी नसल्याने टेंभू योजनेतून तरी आमच्या गावांना पाणी उपलब्ध करून द्या अशी मागणी नागरिकांनी केली होती त्या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करणार असे मी लोकांना आश्वासन दिले होते त्यानुसार बैठक लावून या गावातील भीषण परिस्थिती मंत्री महोदयांच्या समोर मांडली.
फडणवीस यांनी टेंभू योजनेचे सचिव दीपक कपूर यांना मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील माण नदीकाठच्या गावांना पाणी उपलब्ध करण्यासाठी संबंधित नदीवरील बंधारे भरून घ्या अशा सूचना दिल्या आहेत त्यामुळे टेंभू योजनेतून पंढरपूर तालुक्यातील तावशी, तनाळी, तरटगाव, सिद्धेवाडी, चिचुंबे, शेटफळ व मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी, महमदाबाद (शे), गुंजेगाव, घरनिकी, मारापूर, देगांव, शरदनगर या माण नदीकाठच्या गावांना याचा लाभ मिळणार आहे असे आमदार यांनी सांगितले.