प्रणिती शिंदे विधानसभेला निष्ठावंतांना न्याय देणार का? कोण कुठे होणार ॲडजेस्ट
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणूक ही महा विकास आघाडी तितक्याच ताकदीने निवडणूक लढविणार आहे. सोलापुरात प्रणिती शिंदे खासदार झाल्या. त्यांच्या विजयात अनेकांचा वाटा आहे. वडीलांनातर विधानसभेची सर्व सूत्र त्यांच्याच ताब्यात येणार आहेत. तिकीट देण्यात त्यांचेच वर्चस्व राहणार असे चित्र आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीला मोहोळ, माढा, माळशिरस, शिवसेना ठाकरे गटाला सांगोला, बार्शी, करमाळा तर काँग्रेसला अक्कलकोट, दक्षिण, शहर उत्तर सुटण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत माकपची मदत दिंडोरी मतदारसंघात घेतल्याने त्यांनी सीताराम येचुरी यांनी दोन जागा देण्याचा शब्द दिला आहे त्यात दिंडोरी व सोलापूर शहर मध्य म्हणून शहर मध्य ची जागा आडम मास्तर यांना सुटण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
मंगळवेढा पंढरपूर चा विचार केला तर तिथून भगीरथ भालके यांना उमेदवारी निश्चित मिळेल अशी माहिती मिळते. शहर उत्तर मध्ये महेश कोठे यांनी लोकसभेत मदत केली ते उमेदवारीत पहिल्या क्रमांकावर येतात, ते तुतारी घेणार हात चिन्ह का शहर मध्य मध्ये येणार
हे अजून नक्की नाही. तिथून राष्ट्रवादी कडून लिंगायत समाजाचे शंकर पाटील हे सुद्धा इच्छुक असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सपोर्ट केल्याने धर्मराज काडादी हे सुध्दा उत्तर मध्ये योग्य उमेदवार वाटतात. ते सुद्धा उत्तर लढविण्याची शक्यता आहे. लिंगायत समाजातील सुदीप चाकोते हे जास्त प्रयत्नशील असल्याचे बोलले जाते. तर आता नव्याने सुशील बंदपट्टे, राजन कामत, सुनील रसाळे यांची नावे समोर येतात. आंबेडकरी समाजातील ज्येष्ठ नेत्या संध्या काळे या सुद्धा इच्छुक असल्याचे समजते.
शहर मध्य मध्ये आडम मास्तर यांनी मदत केल्याने तो मतदारसंघ त्यांनाच सुटेल अशी शक्यता आहे. फारुक शाब्दि हे एम आय एम चे उमेदवार राहतील, त्यांनीही उमेदवार न देऊन नकळत काँग्रेसला मदत केली. भाजप कडून देवेंद्र कोठे अथवा ऐनवेळी राम सातपुते हे उमेदवार म्हणून येण्याची शक्यता आहे, शिवसेना शिंदे गटाची ही जागा असल्याने इथून शिवाजी सावंत, मनिष काळजे, ज्योती वाघमारे यांची नावे चर्चेत आहेत. मुस्लिम समाजातून तौफिक शेख, रियाज हुंडेकरी हे इच्छुक आहेत. मुस्लिम समाजातून बाबा मिस्त्री यांनी मध्य मधून यावे असे मुस्लिम कार्यकर्ते बोलतात. ऐनवेळी मोची समाजातील संजय हेमगड्डी इच्छुक दिसतात. त्यामुळे प्रणिती शिंदे या मध्यचा गुंता कसा सोडविणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे दक्षिण सोलापूर भाजप कडून सुभाष देशमुख हे तर फिक्स आहेत. 2019 च्या निवडणुकीनंतर सर्वच पक्षापासून अलिप्त राहिलेले माजी आमदार दिलीप माने यांनी भविष्याचा विचार करता लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसमध्ये प्रवेश करत प्रणिती शिंदे यांचा प्रचार केला. त्यामुळे तेही काँग्रेस कडून प्रमुख दावेदार मानले जातात. पडत्या काळात सुशीलकुमार शिंदे प्रणिती शिंदे यांच्यासोबत राहिल्याने आणि मागील सहा महिन्यांपासून प्रणिती शिंदे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीचे मैदान तयार केल्याने काँग्रेस पक्षाकडून यंदा दक्षिणवर सुरेश हसापुरे यांनी दावा सांगितला आहे. बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, डी सी सी बॅक जिल्ह्य़ातील अनेक संस्था हसापुरे हे प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढून ताब्यात देण्यासारखा चाणक्य व्यक्ती असल्याने दक्षिण मधून त्यांना संधी मिळेल अशी दाट शक्यता आहे पण ते लढविणार का नाही हे गुलदस्त्यात आहे शेवटी ते सुशीलकुमार शिंदे यांचे आदेश मानणारे आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसमध्ये आलेले सामाजिक कार्यकर्ते महादेव कोगनुरे हे सुद्धा दक्षिण मधून इच्छुक आहेत त्यांनी सामाजिक कार्यातून आपली चर्चा सुरू ठेवली आहे. शिवसेना उबाठा गटातून अमर पाटील यांनी ही मागणी केली आहे. बाबा मिस्त्री यांनी 2019 ची निवडणूक लढवल्याने ते पुन्हा दक्षिण मधून पुन्हा एकदा आपला क्लेम सांगत आहेत. सिध्देश्वर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी हे ऐनवेळी दक्षिण मध्ये आले तर नवल वाटायला नको.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून निश्चितच माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना काँग्रेस उमेदवारी देईल याची दाट शक्यता आहे परंतु माजी आमदार पुत्र तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील हे सुद्धा इच्छुक असल्याचे समोर येत आहे. अक्कलकोट मध्ये मात्र काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच थेट लढत होते.
खासदार प्रणिती शिंदे यांचे तिकिट देण्यात वर्चस्व राहणार असे चित्र आहे. यापुढे तर त्या काँग्रेस वर्किंग कमिटी वर असून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व अधिकार त्यांना असणार आहेत आणि प्रणिती या राहुल गांधी यांच्या अति निकटवर्तीय झाल्या असल्याने त्याचा दबदबा असणार आहे.