कोण होणार सोलापूरचा पालकमंत्री? तिघांच्या नावाची चर्चा, पुन्हा तेच येणार
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूर मध्ये झाला. यंदा सुद्धा सोलापूरला ठेंगा मिळाल्याचे पाहायला मिळाले. पाच -पाच भाजपचे आमदार असताना कुणालाही मंत्रीपद मिळाले नाही, त्यामुळे सोलापूर मधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
यापूर्वी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील व दत्तात्रय मामा भरणे हे तिघेही पुन्हा मंत्री झाले आहेत. तसेच मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना सुद्धा मंत्रिपद मिळाले आहे.
2019 ते 24 दरम्यान सोलापूरला सलग पाच वर्ष बाहेरचा पालकमंत्री मिळाला. तीच परंपरा यंदाही कायम राहते काय असा प्रश्न उपस्थित होत असून आता सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी यापूर्वी असलेले चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे आणि मान खटाव चे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाची जोरदार चर्च ऐकण्यास मिळत आहे.
परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांमधून चंद्रकांत पाटील यांचीच जोरदार चर्चा आहे. दादाच पालकमंत्री म्हणून पुन्हा येतील असे बोलले जात आहे. पण जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद येईल अशी चर्चा ऐकण्यास मिळू लागली आहे. भरणे मामा यांच्या सोलापुरातील लाडक्या भाच्यांकडून त्यांना पालकमंत्री पद द्यावे अशी इच्छा ही व्यक्त होत आहे पण एकूणच जिल्ह्यातील भाजपची ताकद पाहता जिल्ह्याला भाजपचाच पालकमंत्री होईल हे सुद्धा तितकेच खरे आहे.