भाजपचा उमेदवार कोण? प्रत्येकाच्या तोंडी एकच प्रश्न ; काँग्रेसचे ठरले, आता भाजपचे साबळे, सातपुते, कांबळे, बनसोडे की शिंदे…!
सोलापूर : देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपने उमेदवारांच्या दोन्ही आल्या जाहीर केले आहेत सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी अद्यापही भाजपचा उमेदवार निश्चित झालेला नाही. सोलापूर शहरात गल्लोगल्ली, चौका चौकात प्रत्येकाच्या तोंडात एकच प्रश्न आहे तो म्हणजे भाजपचा उमेदवार कोण?
काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील आणि सोलापूर लोकसभा लढवतील अशी चर्चा सोलापुरात एक वर्षापासून ऐकण्यास मिळत होती. भाजपनेही तसे बरेच प्रयत्न करून पाहिले परंतु प्रणिती शिंदे या त्यांच्या हाती लागल्या नाहीत. शेवटी काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे यांची सोलापूर लोकसभेसाठी घोषणा करून टाकली. त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
भारतीय जनता पार्टी कडे यंदा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तब्बल 40 जण इच्छुक आहेत. प्रत्येकाने आपापल्या परीने पक्षाकडे मागणी करत फिल्डिंग ही लावली आहे. यंदा सोलापुरात ओरिजनल जातीचा दाखला असलेला अनुसूचित जातीचा स्थानिक उमेदवार द्यावा या मागणीने जोर धरला आहे. मागील दोन खासदारांचा अनुभव पाहता भारतीय जनता पार्टी यंदा कोणताही रिस्क घेण्यास तयार नाही. एकीकडे सोलापूर मधून उमेदवारा बद्दल होत असलेली मागणी आणि विरोधात असलेल्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे त्यामुळे भाजप चाचपणी करून उमेदवार देणार आहे. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या तोडीस तोड आक्रमक युवा चेहरा भाजपने द्यावा अशी मागणी सोलापूरचे कार्यकर्ते करीत आहेत.
सोलापूर लोकसभेसाठी प्रामुख्याने राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे, माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते, पुनश्च एकदा स्थानिक आणि ओरिजनल म्हणून शरद बनसोडे, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींच्या जवळ मानले जाणारे पुण्यातील मिलिंद कांबळे, सोलापुरातील पत्रकार दिलीप शिंदे यांच्या नावाची चर्चा ऐकण्यास मिळते.
या सर्वांसोबतच प्रवक्ते लक्ष्मण ढोबळे हे आपली कन्या कोमल साळुंखे यांच्यासाठी प्रयत्न करीत आहेत तसेच भाजपच्या माजी नगरसेविका संगीता जाधव, भाजपचे माजी नगरसेवक नारायण बनसोडे, सरपंच विश्रांत गायकवाड, कॉन्ट्रॅक्टर राजेश मुगळे, राजशेखर कंदलगावकर, शिवसिद्ध बुळळा हे सुद्धा इच्छुक असल्याचे समजते.
देशात एक हाती सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टीला सोलापूर लोकसभेसाठी स्थानिक उमेदवार मिळत नाही ही या पक्षाची शोकांतिका म्हणावी लागेल. मागील पाच वर्षात त्यांना लोकसभा लढवण्यासाठी लायक उमेदवार तयार करता आला नाही. भाजपमध्ये अनुसूचित जातीचे अनेक कार्यकर्ते आहेत, पण आपला कार्यकर्ता खासदार होऊन आपल्याच डोक्यावर बसेल यामुळेही इथले नेते कुणाला मोठे होऊ देत नाहीत हे सुद्धा तितकेच खरे आहे.