दिलीप माने यांचे हे कसले राजकीय डाव ; स्वतः काडादी सोबत, कार्यकर्त्यांचा भाजपाला पाठिंबा अन् मोहोळसाठी मानेंना सपोर्ट
सोलापूर : काँग्रेसची उमेदवारी जाहीर होऊन एबी फॉर्म न मिळाल्याने दक्षिणच्या मैदानातून माघार घेतलेले माजी आमदार दिलीप माने यांनी आपले राजकीय डाव टाकण्यास सुरुवात केली आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काही दिवस शांत राहिलेल्या दिलीप माने यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर करत त्यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.
यामुळे काडादी यांची ताकद वाढली असे बोलले जात असतानाच दुसरीकडे दिलीप माने यांच्या समर्थक माजी नगरसेवक नागेश ताकमोगे आणि दादाराव ताकमोगे, परिवहनचे माजी सदस्य नितीन भोपळे, ब्रह्मदेव दादा माने बँकेचे माजी संचालक आनंदराव देठे, सचिन चौधरी, विलास लोकरे, शाम कदम, लक्ष्मण जाधव, शिवसेनेचे जितेंद्र पवार आदींनी आता आमदार सुभाष देशमुख यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत मनीष देशमुख, आणि रोहन देशमुख हेही उपस्थित होते. माने समर्थकांचा हा पाठिंबा काडादी यांना जोरदार धक्का मानला जात आहे.
दुसरीकडे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील 24 गावांमध्ये दिलीप माने यांची मोठी ताकद आहे. त्या ठिकाणी माने हे काय निर्णय घेणार याची उत्सुकता होती पण तिथे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार यशवंत माने यांना दिलीप माने यांनी उघडपणे पाठिंबा जाहीर केला आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजू खरे यांची यामुळे अडचण होण्याची शक्यता आहे आता उत्तर मध्ये पुन्हा दिलीप माने विरुद्ध काका साठे अशी लढत पाहायला मिळेल.