दोन आमदारांच्या थेट लढतील माजी आमदाराचे काय काम ; पुन्हा उपरा विषय येणार चर्चेला
सोलापूर : सोलापूर लोकसभा राखीव मतदार संघासाठी सध्या भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या दोघांमध्ये जोरदार टशन पाहायला मिळते. दोन्हीही आमदार एकमेकांच्या तोडीस तोड, सडेतोड, आक्रमक, अभ्यासू असल्याने आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्याच फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या सरळ सरळ लढतीमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे.
या दोघांत आता तिसरा उडी घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रणिती शिंदे व राम सातपुते हे विद्यमान आमदार आहेत तर त्यांच्यात आता तिसरा माजी आमदार निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम दोन पक्षांची युती होती. त्यावेळी स्वतः प्रकाश आंबेडकर हे सोलापुरात उमेदवार होते. त्यानंतर या दोघांची युती तुटली. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार घोषित केला आहे. त्यामुळे एमआयएम हा पक्ष सुद्धा उमेदवार देण्याच्या तयारीत दिसून येतो.
सोलापूरची जागाही अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने त्या जागेसाठी मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. एमआयएमच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांची सोलापुरात भेट ही घेतली त्यामुळे या चर्चेला आणखीच उधाण आले आहे.
मुळात रमेश कदम हे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. ते आमदार असताना त्यांनी मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यात प्रचंड अशी कामे केली. मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता या माध्यमातून कोणतीही जात पात न पाहता ते थेट जनतेची संपर्कात राहिल्याने त्यांची राज्यभरात चर्चा झाली नंतर काही प्रकरणात त्यांना अटक झाली तब्बल आठ वर्ष ते तुरुंगात राहिले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोहोळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यामध्येही त्यांना 25000 पर्यंत मते मिळाली. एकूणच त्यांची मोहोळ तालुक्यात लोकप्रियता पाहायला मिळते. त्यामुळे त्यांनी एमआयएम पक्षाकडून उमेदवारी घ्यावी का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
काही दिवसांपूर्वी त्यांनी पुन्हा मोहोळ लढवण्याचा निर्धार बोलून दाखवला. एमआयएमचा बहुतांश मतदार हा बहुतांश मुस्लिम समाज असतो. त्यामुळे एकूणच देशातील वातावरण पाहता, मुस्लिम समाजाच्या बाबतीत घडलेल्या विविध घटना पाहता मुस्लिम समाज सावध असल्याचे चित्र आहे. एमआयएमने जरी उमेदवार दिला तरी मुस्लिम समाज मतदान करतील का? असेही प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर वगळता आंबेडकरी पक्ष निवडणूक लढवतात परंतु ते पन्नास हजार ते लाखापर्यंत ही जात नाहीत. त्यामुळे एमआयएम तरी किती चालणार अशीही चर्चा आहे. भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यातील ही थेट लढत आहे. आमदार रमेश कदम हे जरी मोहोळचे माजी आमदार राहिले असले तरी ते मुंबईचे आहेत, स्थानिक सोलापूरचे नाहीत त्यामुळे त्यांच्याही बाबत उपरा हा विषय येऊ शकतो असेही बोलले जात आहे.