मुंबईतील मराठी माणसाला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आम्ही वाट्टेल ते करू ; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
मुंबई येथे आ. प्रविण दरेकर आयोजित गृहनिर्माण सहकार परिषदेतील स्वयंपुनर्विकास/पुनर्विकासाच्या निर्णयाबाबत कृतज्ञता सोहळा – “धन्यवाद देवेंद्रजी” या कार्यक्रमात सहभागी होण्याचे सौभाग्य लाभले. या कार्यक्रमाला उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले. लोकांचा प्रचंड उत्साह, विश्वास, जोश, प्रेम व आशीर्वाद पाहून मी भारावून गेलो.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री दिपक केसरकर, मंत्री अतुल सावे, मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार, खा. गोपाल शेट्टी, खा. राहुल शेवाळे, खा. पूनम महाजन, खा. मनोज कोटक, आ. प्रवीण दरेकर, आ. कालिदास कोळंबकर आदि खासदार, आमदार व इतर मान्यवर आणि असंख्य मुंबईकर उपस्थित होते.
मुंबईतील मराठी माणसाला हक्काचे घर का मिळत नाही, याचा अभ्यास करून सन 2019 मध्ये शासन निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली, पण दुर्दैवाने आपले सरकार गेले आणि हा शासन निर्णय बाजूला ठेवून महाराष्ट्रात बिल्डरांच्या फायद्याचे धोरण आणले गेले. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न महाविकास आघाडी सरकारने गुंडाळले.
पुन्हा युतीचे सरकार आले आणि पुन्हा कामाला सुरुवात झाली, आ. प्रवीण दरेकर यांनी सर्व गृहनिर्माण संघटनांची परिषद घेऊन अडथळे समजून घेतले आणि माझ्यासमोर 16 मागण्या मांडल्या आणि आम्ही शासन निर्णय घेऊन त्या मान्य केल्या.
पुन्हा 35 मागण्या माझ्यासमोर मांडल्या, यातील 8 मागण्या आजच मंजूर करण्यासारख्या आहेत पण या सर्व मागण्यांवर 15 दिवसात बैठक घेऊन या सर्व मागण्यांचा पाठपुरावा करून त्या पूर्ण केल्या जातील.
या कार्यक्रमासाठी 8,000 गृहनिर्माण संस्था आणि 25,000 लोकांनी नोंदणी केल्याचा मला आनंद आहे. या माध्यमातून आलेल्या सर्व निवेदनांवर आम्ही काम करू आणि लवकरात लवकर या प्रश्नांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू.
म्हाडाने 27 पैकी 17 पोलिस वसाहती विकसित करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्याची घोषणा केली जाईल. मराठी माणसाला मुंबईत घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारने गृहनिर्माण संस्थांचे अनेक कर कमी केले आहेत.
मुंबई सामान्य माणसाच्या आणि कष्टकऱ्यांच्या कष्टाने उभी राहिली आहे. पुढच्या 10 वर्षात मराठी माणसाला अभिमानाने, स्वाभिमानाने स्वतःच्या हक्काच्या घरात जगता येईल, अशा मुंबईकरिता तुमचा आशीर्वाद घ्यायला मी आलो आहे,
मला धन्यवाद नको मला तुमचा आशीर्वाद हवा आहे!
मुंबईतील मराठी माणसाला आम्ही हद्दपार होऊ देणार नाही, त्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आम्ही वाट्टेल ते करू ! अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.