प्रभाग २२ साठी आरोग्याचा नवा श्वास ! सोनी नगर येथे नूतन ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’ सुरू
सोलापूर - सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ मधील नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने मोठी आणि दिलासादायक ठरला आहे. सोनी नगर येथे नूतन ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’ उभारण्यात आले असून परिसरातील हजारो नागरिकांना याचा थेट लाभ होणार आहे. या केंद्रासाठी प्रभागातील भाजपा नगरसेवक किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका गायकवाड व चैत्राली गायकवाड यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि प्रशासनाच्या सहकार्याने हे केंद्र साकार झाले.
सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, उपायुक्त लोकरे व आरोग्य अधिकारी राखी माने यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राची उभारणी पूर्ण झाली. या केंद्रामुळे सोनी नगर हुडको, लहान इरण्णा वस्ती, मोठी इरण्णा वस्ती, रेवणसिद्धेश्वर नगर झोपडपट्टी, आम्रपाली चौक परिसरातील नागरिकांना आर्थिक आणि आरोग्यदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे. उद्घाटनानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करून मोफत औषधोपचार देण्यात आले.
अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेले हे केंद्र कष्टकरी कामगारांसाठी वरदान ठरणार असल्याचे नगरसेवक किसन जाधव यांनी सांगितले. तसेच या उपक्रमासाठी पालकमंत्री गोरे आणि आमदार कोठे यांचे त्यांनी विशेष आभार मानले. प्रभाग २२ मध्ये आरोग्यसेवेचा हा नवा अध्याय ठरून नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या आरोग्य शिबिराप्रसंगी डॉ. म्हेत्रे, प्राजक्ता काकडे, रुपेश गायकवाड, संतोष माने, इस्माईल मनुरे, मल्लिकार्जुन बेनावत, अविनाश गवळी, उमेश चलवादी,प्रीती गायकवाड आदी आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांच्यासह नागेश ढेंगळे, संतोष गायकवाड, हरीश तेलगू, विकी सगटे, सिद्राम माडेकर, येलगुंडे मावशी, वसंत पवार आदींची उपस्थिती होती. या आरोग्य शिबिरास परिसरातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.


















